राज्य सरकारचा महसूल बुडाला

बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमुळे मालवाहतूक उद्योगाचे उत्पन्न बुडतानाच राज्य सरकारचाही महसूल बुडाल्याचा दावा मालवाहतूक संघटनेकडून करण्यात आला आहे. जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टकडून देण्यात आली.

राज्यात १२ लाख ट्रक असून यातून मोठय़ा प्रमाणात मालाची वाहतूक होते. परंतु बुधवारी महाराष्ट्र बंदमुळे ही वाहतूक होऊ शकली नाही. ट्रकचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी मालवाहतूक बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठय़ा नुकसानीला मालवाहतूकदार आणि राज्य सरकारला सामोरे जावे लागल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टचे कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले. सध्या १२ लाख ट्रकपैकी प्रत्येक ट्रकला दररोज २०० लिटर डिझेल लागते. याप्रमाणे २४ कोटी डिझेलचा दररोज वापर होतो. प्रत्येक लिटरमागे डिझेलवर ४२ रुपये करही लागतो. हे पाहिल्यास दिवसाला एकूण एक हजार आठ कोटी रुपये राज्य सरकारचा महसूल बुडाल्याचे सिंग म्हणाले. याव्यतिरिक्त मालवाहतूकदारांचेही एकूण उत्पन्न बुडाले आहे. हे उत्पन्न दोन हजार कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला.

  • मुंबई विमानतळावरील विमान सेवांवरही परिणाम झाला. काही विमानांची उड्डाणे आणि आगमन रद्द करण्याची वेळ ओढवली. जेट एअरवेजच्या ३२ फेऱ्यांना त्याचा फटका बसला, तर इंडिगोची एक सेवा रद्द करावी लागली.