मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय; धोकादायक पुलांचा पाहणी अहवाल उघड

सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावरील पादचारी पूल आणि उड्डाणपुलांचा संयुक्त पाहणी अहवाल समोर आणला आहे. त्यात ३० पादचारी पुलांची तातडीने म्हणजे डिसेंबर २०१९ पर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.

जुलै २०१८ मध्ये अंधेरी स्थानकातील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पादचारी पूल, उड्डाणपूल आणि अन्य पुलांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रेल्वे, मुंबई पालिका, आयआयटीकडून संयुक्तरीत्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवालही सादर करण्यात आला. या अहवालानुसार काही स्थानकांत त्वरित कामेही हाती घेण्यात आली. मध्य रेल्वेपेक्षा पश्चिम रेल्वेने पुलांच्या कामात आघाडी घेतली आहे. पश्चिम रेल्वेने ११५ पादचारी पूल व २९ उड्डाणपुलांची पाहणी केली. २८ उड्डाणपूल सुरक्षित असून फक्त लोअर परळ स्थानकाबाहेरील उड्डाणपूलच असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आणि तो तात्काळ रहदारीसाठी बंदही केला. त्याची पुनर्बाधणी नऊ महिन्यांत केली जाईल, तर पाच उड्डाणपुलांची किरकोळ दुरुस्ती होणे गरजेचे होते आणि ही दुरुस्ती करण्यात आली आहे. तर वांद्रे कलानगर, अंधेरी, माहिम, वसई, मालाड येथील उड्डाणपुलांची व त्यावरील पादचारी मार्गिकेची दुरुस्ती जुलैपर्यंत केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. याशिवाय चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, प्रभादेवी, दादर स्थानकातील प्रत्येकी एक, खार स्थानकातील दोन, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड स्थानकांतील एका पादचारी पुलांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर चार स्थानकांत नव्याने पादचारी पूल उभारले जातील.

यात वांद्रे स्थानकात दोन, खार, माहिम स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील संयुक्त पाहणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील संयुक्त पाहणीचे काम मात्र धिम्या गतीनेच सुरू आहे.

आतापर्यंत ८९ उड्डाणपुलांपैकी ८१ पुलांची पाहणी पूर्ण झाली आहे, तर १९१ पैकी १७८ पादचारी पूल आणि १९ अन्य पुलांपैकी (पाइप पूल इत्यादी) १७ पुलांची पाहणी केली.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीत पाहणी केलेल्या १७८ पादचारी पुलांपैकी अवघा मुंब्रा स्थानकातील पादचारी पूल असुरक्षित होता आणि तो पाडण्यात आला, तर १० पुलांची किरकोळ दुरुस्ती केली जाणार असून यामध्ये कुर्ला, विक्रोळी, भांडुप, कल्याण यासह अन्य स्थानकांचा समावेश आहे.

माहिती गुलदस्त्यात

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्याची दुर्घटना जुलै २०१८ मध्ये घडली होती. रेल्वे हद्दीतील सर्व पुलांची पाहणी व तपासणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे, पालिका आणि आयआयटीच्या संयुक्त पथकाला सहा महिन्यांचा कालावधी रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आला होता. मध्य रेल्वेकडून मात्र अहवाल समोर आणताना उपनगरीय मार्गावरील कोणत्या स्थानकातील पूल सुरक्षित किंवा असुरक्षित आहेत आणि कोणत्या स्थानकातील पुलांची कामे पूर्ण झाली आहेत याची माहिती मात्र समोर आणली नाही.