सहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता; पंधरा जिल्ह्य़ांसाठी नवी वाहने

राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती  व  इतर मान्यवर जिल्ह्य़ांना भेटी देत असतात, त्या वेळी त्यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ३० नव्या इनोव्हा गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुमारे सहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राज्य पाहुणे म्हणून मान्यता देण्यात आलेल्या व्यक्ती व इतर मान्यवर जिल्ह्य़ांच्या भेटीवर जातात, त्या वेळी त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात काही वाहनांची व्यवस्था केली जाते. अलीकडे अशा प्रकारची काही जुनी वाहने रद्द करण्यात आली आहेत, तर काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वांच्या व्यक्तींची प्रवासाची गैरसोय होत आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय वाहनांची खरेदी व त्याचा वापर करण्यासंदर्भात एक राज्य स्तरीय वाहन धोरण आढावा समिती स्थापन केली आहे.

गेल्या वर्षी समितीने घेतेलल्या आढाव्यात अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी २२५ वाहने खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार सध्या वाहनांची आवश्यकता असलेल्या १५ जिल्ह्य़ांसाठी ३० नवीन इनोव्हा गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टोयाटो इनोव्हा क्रिस्टा या गाडय़ा टोयाटा किलरेस्कर मोटार प्रा. लि. कंपनींकडून खरेदी करण्यात येणार आहेत. या ३० गाडय़ांची किंमत ५ कोटी ८३ लाख ६६ हजार २३ रुपये आहे.

  • ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला आणि बुलढाणा या पंधरा जिल्ह्य़ांसाठी नवीन गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत.
  • ही वाहने ठाणे येथून, संबंधित जिल्ह्य़ांत पोहचविण्यासाठी आणखी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी ४ लाख ४५ हजार ५६६ रुपये खर्च येणार आहे.
  • त्यानुसार वाहने खरेदी व ती त्या-त्या जिल्ह्य़ात पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे, असा मिळून एकूण ५ कोटी ८८ लाख ११ हजार ५८९ रुपये खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे.