संदीप आचार्य, मुंबई

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचा सहभाग वाढवण्याबरोबरच डॉक्टरांकडून जास्तीत जास्त शस्त्रक्रिया व उपचार व्हावे यासाठी डॉक्टरांना ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयांसह आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशी मिळून सुमारे ५०० रुग्णालये असून जवळपास २३ हजारांहून अधिक खाटा या रुग्णालयांमध्ये आहेत. तथापि, महात्मा फुले जनआरोग्य विमा योजनेंतर्गत आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची कामगिरी अत्यंत सुमार असल्यामुळे या विमा योजनेचा सर्वाधिक फायदा हा खासगी रुग्णालयांनाच होत होता. महात्मा फुले योजनेंतर्गत जवळपास पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत असून सुमारे २० लाख शस्त्रक्रिया आतापर्यंत झाल्या आहेत. यात आरोग्य विभागाचा वाटा अत्यंत नगण्य असून ४२ रुग्णालयांमध्ये ६५ हजार शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. केवळ ९३ कोटी एवढाच विमा योजनेचा वाटा आरोग्य विभागाला मिळाला आहे. याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रधान सचिवांनी शस्त्रक्रियांचे प्रमाण तसेच उपचारांचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले. या योजनेत आरोग्य विभागाच्या अधिकाधिक रुग्णालयांची नोंद करण्याची भूमिकाही डॉ. व्यास यांनी घेतली आहे. यानुसार जवळपास ८२ रुग्णालयांची सध्या नोंद करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य विमा योजनेत जो वाटा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना मिळणार आहे त्यातील २० टक्के रक्कम ही प्रोत्साहनात्मक भत्ता म्हणून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच ५२ टक्के रक्कम ही रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी व आपत्कालीन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे रुग्णालयांचा कारभार प्रभावी होईल, असा विश्वास डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला. २० टक्के रकमेपैकी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि फिजिशियन यांना ३० टक्के प्रोत्साहन भत्ता मिळेल तर सहकारी डॉक्टरांना १५ टक्के, भूलतज्ज्ञांना १० टक्के,  वॉर्ड बॉय, परिचारिका आदींना १५ टक्के, तांत्रिक कर्मचाऱ्यांना चार टक्के, वैद्यकीय समन्वयक ५ टक्के व अन्य लोकांना १५ टक्के अशा प्रमाणात हे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील अन्य राज्यांमध्ये या योजनेत आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना विमा योजनेतून किमान २५ ते २८ टक्के रक्कम मिळते. महाराष्ट्रात हे प्रमाण १३ टक्के होते. ते वाढणे तसेच आरोग्य विभागाच्या रुग्णालयात जास्तीत जास्त शस्त्रक्रिया व्हाव्या यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून रुग्णालयांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.

– डॉ. सुधाकर शिंदे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी