राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ३० हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात सोमवारी मुख्यमंत्र्यांनी खास बैठक घेऊन हायब्रिड अ‍ॅन्युइटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांने उद्दिष्ट असून १४ हजार ८४४ कि.मी. लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी ४४५२ कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. ६७५६ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्टोबरपासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर २०१९ पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस.मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी यू.पी.सिंह, पंकज उके, राजेंद्र प्रसाद आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बुलेट ट्रेनचा आढावा

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर कालबद्घ कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

बैठकीत या प्रकल्पाशी निगडित विविध बाबींवर जिल्हानिहाय आढावा सादर करण्यात आला. संपादित जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा, तसेच इतर अन्य प्रशासकीय मान्यतेबाबतीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.