अवाजवी दर आकारणीवर निर्बंध नसल्याने रुग्णालयांना फटका; २५० लिटर सिलिंडरसाठी नऊ हजार रुपये

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : राज्यभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी वाहतुकीच्या अडचणी सोडविण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली असली तरी ऑक्सिजनसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी दरावर मात्र कोणताही अंकुश लावलेला नाही. परिणामी विक्रेत्यांनी जवळपास ३० ते ४० टक्के दरवाढ के ल्याने रुग्णालयांना याचा फटका बसत आहे.

ऑक्सिजन उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडून पुरवठा नियमितपणे होत नसल्याने मुंबईसह राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पुरेसा साठा असूनही निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेच्या अडचणीमुळे ऑक्सिजनची कुठेही कमतरता होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. परंतु ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने पूर्वीच्या दरामध्ये ऑक्सिजन पुरविणे शक्य नसल्याचे कारण देत विक्रेत्यांनी आणि वितरकांनी ऑक्सिजनचे दर अवाच्या सव्वा वाढविले आहेत.

ऑगस्टपर्यंत २५० लिटर द्रवरूप ऑक्सिजन सिलिंडर ६२५० रुपयांना मिळत होता. राज्यभरात मागणी वाढल्याने मुंबईत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे दर वाढविल्याचे सांगत कंपनीने सप्टेंबरपासून याच सिलेंडरचे दर नऊ हजार रुपये केले असल्याची माहिती घाटकोपरच्या खासगी रुग्णालयांनी दिली. आतापर्यंत ऑक्सिजन १२ रुपये घनमीटरने विक्रेते देत होते. त्यामुळे आम्ही १५ रुपयापर्यंत विक्री करत होतो. गेल्या आठवडय़ापासून याची किंमत १५ रुपये झाली आहे. त्यात पुरवठाही कमी होतो. त्यामुळे मग आम्हीही आता २५ रुपये प्रति घनमीटरने रुग्णालयांना पुरवितो, असे ठाण्यातील ऑक्सिजन वितरकाने सांगितले. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) ऑक्सिजनचे दर प्रति घनमीटर किंवा १००० लिटरमागे १७.४९ रुपये निश्चित केले आहेत. त्यामुळे रुग्णाला किंवा रुग्णालयांना ते याच दरात मिळणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विक्रीवर कोणाचेच निर्बंध नाहीत. ६०० लिटर ऑक्सिजन सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत मिळत होता. यासाठी आता १८०० रुपये आकारले जात आहेत. एकीकडे खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या दर आकारणीवर सरकारने निर्बंध आणले, परंतु रुग्णालयांनाच वाढीव किमतीने मिळत असल्याने परवडत नाही. यासंबंधी कारवाई करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. एनपीपीएने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत.  रुग्णालयांनी तक्रार केल्यास कारवाई करू, असे अन्न व औषध प्रशासनाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वाहनांना दिवा आणि सायरन लावण्याची मुभा

साथरोग अधिनियम १९८च्या कलम २ मधील अधिकारांचा वापर करत पुढील एक वर्षांसाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येत आहे. त्याअन्वये केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यानुसार रुग्णवाहिके प्रमाणे दिवा आणि सायरन लावण्याची मुभा या वाहनांना देण्यात आल्याचे गृह विभागाने अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.