सेवेत आणखी तत्परता येण्याची आशा

तोटय़ात चालणाऱ्या २२६ वातानुकूलित बसगाडय़ा बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असला तरी परिवहनच्या ताफ्यात नव्या कोऱ्या ३०३ बसगाडय़ा दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना बसची खूप वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यातील ७२ बसगाडय़ा मुंबईच्या कुलाबा आणि बॅकबे आगारात दाखल झाल्या आहेत. या बसगाडय़ांची परिवहन विभागात नोंदणी सुरू आहे.

येत्या आठवडय़ाभरात या बसगाडय़ा मुंबईच्या रस्त्यावर धावतील. अत्याधुनिक अशा या बस टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडून तयार करण्यात आल्या आहेत. एका बसची किंमत ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या बसेस लवकरच मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. एप्रिल अखेपर्यंत सर्व ३०३ बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील ४०० जुन्या बसगाडय़ा नादुरुस्त झाल्यामुळे काढून टाकाव्या लागल्या होत्या. त्यामुळे बेस्टच्या बसचा तुटवडा निर्माण झाला होता. बेस्टकडे नवीन बस खरेदीसाठी निधी नसल्यामुळे महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पात १०० कोटींचे अनुदान दिले होते. सुरुवातीला बॅकबे आगारातून या बसगाडय़ा धावणार असून पुढे टप्प्याटप्प्याने सर्व आगारांमध्ये या बसेस सुरू करण्यात येणार आहे.

बसगाडय़ांची वैशिष्टय़े

टाटा कंपनीकडून तयार करून घेतलेल्या या बसगाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल चाìजगची सोय करण्यात आली आहे. लोकलमध्ये असतात तसे हवेचे झोत, बेस्ट बस चालकासाठी खास खुर्ची, ऑटोमेटिक क्लच, एलईडी लाइट, बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशस्त दरवाजे, मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्तकालीन प्रवेशद्वार अशा असंख्य सुविधा या नवीन बसेसमध्ये देण्यात आले आहेत. सध्या जुन्या बसची लांबी ११ मीटर असून नवीन बसची लांबी १२ मीटपर्यंत वाढवली आहे. सध्या ७२ बसेसपकी ३२ बसची परिवहन विभागात नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित बसची नोंदणी झाल्यावर लवकरात लवकर या बस मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येतील, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफाणे यांनी सांगितले.