नेस्को केंद्रात आतापर्यंत ३०० रुग्णांच्या आवाजाचे संकलन

मुंबई: आवाजावरून करोनाची चाचणी करण्याबाबत गोरेगावच्या नेस्को करोना उपचार केंद्रात सुरू असलेल्या संशोधनाअंतर्गत १५ दिवसात ३०० रुग्णांचे आवाज संकलित करण्यात आले आहेत. येत्या चार-पाच दिवसात पहिल्या टप्प्यातील ५०० रुग्णांचे आवाज संकलित करण्यात येतील.

या केंद्रात १ सप्टेंबरपासून आवाजावरून करोना उपचारासाठी दाखल के ल्या जाणाऱ्या रुग्णांचे आवाज संकलित करण्याच्या संशोधनाला सुरुवात झाली आहे.  पहिल्या टप्प्यातील ५०० पैकी ३०० रुग्णांचे आवाज संकलित केल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिली. इस्त्रायलमधील ‘वोकालिस्ट हेल्थकेअर‘ या कंपनीच्या सहकार्याने आवाजावरून करोना चाचणी करण्याचे हे संशोधन मुंबईत प्रथमच होत आहे. कंपनीने दिलेल्या टॅबवर पालिका २००० रुग्णांचे आवाज संकलित करून देणार आहे.   संसर्गामध्ये घशाला आणि फुप्फुसाला सूज येते. त्यामुळे आवाजावर आणि उच्छवासावर परिणाम होतो. हा परिणाम बोलण्यातून जाणवतो. आवाजाचे नमुने संगणकाला देऊन त्याद्वारे निष्कर्ष काढण्याचे हे तंत्रज्ञान आहे.

एका रुग्णासाठी २० मिनिटे

आवाज संकलित करण्यासाठी रुग्णांना हिंदी, इंग्लिश, मराठी किंवा गुजराती या चारपैकी एका भाषेत वीस अंक मोजायचे आहेत. त्यांचा आवाज आणि त्यांच्या खोकल्याचा आवाज या टॅबमध्ये संकलित केला जाणार आहे.  आवाज संकलित करण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात. सहा तासांमध्ये दोन संशोधकांच्या साहाय्याने २५ रुग्णांचेच आवाज संकलित करता येत होते. आता आम्ही दोन संशोधक वाढवले असून दिवसात ५० आवाज संकलित केले जात असून येत्या चार पाच दिवसात ५०० चा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशीही माहिती आंद्राडे यांनी दिली.