५३ अटकेत, ३०० ताब्यात, १६ अल्पवयीन मुलांचा सहभाग

भीमा-कोरेगावच्या पाश्र्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान मुंबईत दगडफेक, तोडफोड करणाऱ्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सुमारे ३०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी ५३ आंदोलकांना अटक करण्यात आली तर १६ अल्पवयीन मुलांवर कारवाई करून त्यांना डोंगरी येथील बाल सुधारगृहात धाडण्यात आले. अल्पवयीन युवकांचा दगडफेकीत सहभाग होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आंबेडकरी संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदनिमित्त अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक करण्यात आली. मुंबईच्या पूर्व उपनगरात आंदोलकांकडून सर्वात जास्त नुकसान घडले. बुधवारी दुपारी आंदोलकांचा एक जमाव चक्क पवई पोलीस ठाण्यावर चालून गेला. आमच्या कार्यकर्त्यांला का अटक केली, त्याला तात्काळ सोडा, अशी या जमावाची मागणी होती. या जमावाला बाहेर काढताना काही कार्यकर्ते पोलिसांना भिडले. त्यानंतर बाहेर येऊन पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. तसेच तेथून परतताना या जमावाने ठिकठिकाणी खासगी, सरकारी वाहनांचे नुकसान केले. या जमावाला आवरताना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे यांच्यासह सुमारे १५ अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. या चकमकीत पोलिसांनी ५ महिलांसह २४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या सर्वाना जमाव जमवून दंगल करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सरकारी कर्तव्यात अडथळा आणणे या कलमान्वये अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ९ तर बुधवारी १६ गुन्हे दाखल केले गेले. आंदोलन सुरू असताना सुमारे ३०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी ५३ जणांना अटक करण्यात आली. कायदा हाती घेणाऱ्या अन्य आंदोलकांचा शोध सुरू आहे.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पूर्व उपनगरात दगडफेक करणाऱ्या १६ अल्पवयीन मुलांवर कारवाई केली. गोवंडी, चेंबूर येथील आंदोलनात या अल्पवयीन युवकांनी दगडफेकीत सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. २५पैकी काही गुन्हय़ांमध्ये हत्येचा प्रयत्न, कट रचणे ही गंभीर कलमेही जोडण्यात आल्याची माहिती मिळते. मंगळवार, बुधवारी घडलेल्या घटना, घडामोडींमधला सहभाग स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाइलमध्ये कैद केलेल्या चित्रणाची मदत घेतली जात आहे.