गिरण्याच्या भूखंडावरील प्रकल्पांसह म्हाडाही नोंदणीत आघाडीवर

रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नव्या किंवा प्रगतीपथावरील प्रकल्पांतील नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून त्यासाठी फक्त २४ दिवस शिल्लक असताना आतापर्यंत ३०० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. ही संख्या अत्यल्प असून शेवटच्या दिवसांत शेकडो प्रकल्पांची नोंदणी होईल, असा विश्वास अद्यापही महारेराला वाटत आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक इस्टेट एजंटांनी नोंदणी केली आहे.

‘महारेरा’च्या संकेतस्थळावर नोंद झालेल्या प्रकल्पांची माहिती सहजगत्या पाहावयास मिळत आहे. खरेदीदारांनी संकेतस्थळावर जाऊन खात्री करून मगच घर खरेदी करावी, असे आवाहन महारेराने केले आहे. मुंबई शहराऐवजी उपनगरात सर्वाधिक म्हणजे ४४ प्रकल्प नोंदले गेले आहेत. ठाण्यात १७ प्रकल्प नोंदले गेले आहेत. नव्या किंवा प्रगतीपथावरील प्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी म्हाडानेही पुढाकार घेतला आहे. म्हाडाने सर्वाधिक प्रकल्प नोंदविले आहेत. गिरण्यांच्या भूखंडावरील बहुसंख्य गृहप्रकल्पांचीही नोंदणी करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे प्रगतिपथावरील प्रकल्पांनाही नोंदणी केल्याशिवाय जाहिरात वा विक्री करण्यास बंदी आहे, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मध्य प्रदेश रेरा नियामक प्राधिकरणाने तसे आदेशही जारी केले. महारेराने मात्र याबाबत पुढाकार घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. या बाबत मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे.

म्हाडाच्या या प्रस्तावित प्रकल्पांची नोंदणी : प्रतीक्षा नगर टप्पा चार, उन्नतनगर येथे ८३ अल्प उत्पन्न गटातील संक्रमण गाळे, तुंगा पवई येथे उच्च उत्पन्न गटातील ७२, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी ९४ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी १८२ सदनिका, सिद्धार्थ नगर येथे २८ अल्प उत्पन्न गटातील सदनिका, मागठाणे येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४३० सदनिका, महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १७२ सदनिका, गव्हाणपाडा, मुलुंड येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी ४४२ तर मध्यम गटासाठी २५८ सदनिका, कन्नमवार नगर येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी १९५० तर मध्यम गटासाठी २२४ सदनिका.

या गिरण्यांच्या भूखंडावरील गृहप्रकल्पांची नोंदणी : सेन्चुरी, प्रकाश कॉटन, रुबी, ज्युबिली, वेस्टर्न इंडिया