शहरातील निम्मे रुग्ण एकाच उपनगरात; दूषित पाणीपुरवठय़ाचा फटका

मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी अद्याप डोके वर काढले नसले तरी अशुद्ध पाणी प्यायल्याने कुर्ला परिसरात काविळीच्या आजाराने थैमान घातले आहे. गेल्या चार महिन्यांत या ठिकाणी काविळीचे ३०४ रुग्ण आढळले असून शहरातील सर्व विभागांच्या तुलनेत निम्मे रुग्ण या भागात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पालिकेच्या एल विभागात मार्च महिन्यात १८ काविळीचे रुग्ण निदर्शनास आले होते. ही संख्या उत्तरोत्तर वाढतच असून जून महिन्यात १६९ रुग्णांना काविळीची लागण झाली आहे. काविळीचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामधून संभाजी चौक भागातील जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने पाणी दूषित झाल्याने ही साथ पसरल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या भागात अनेक ठिकाणी गटारांच्या आणि रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाच्या वेळेस जलवाहिनी फुटली असल्याचा पालिकेने अंदाज व्यक्त केला आहे.

या भागातील संभाजी चौक, बुद्धा कॉलनी, एलआयजी, एसआयजी, सीएसटी रस्ता, मश्रानी लेन, कुर्ला गार्डन या भागातून हिपेटाईटिस ए आणि ईचे रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या २४ वार्डमधून मार्च ते जून या काळात ६४३ काविळीचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर पालिकेने या भागातील पाणीपुरवठा विभागाच्या समन्वयाने पाइपलाइनच्या दुरुस्ती आणि पाण्याचा दर्जा तपासणीवर भर दिला आहे. तसेच या भागातील घराघरांमध्ये तपासणी करून संभाव्य कावीळ रुग्णांना उपचारांसाठी पाठविले आहे. घरांमध्ये पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटपही पालिकेने केले आहे.

काविळीच्या रुग्णांची संख्या

महिना एल विभाग     एकूण विभाग

मार्च      १८                  ९५

एप्रिल    २९                  ८८

मे          ८८                  १७८

जून       १६९                २८२

एकूण     ३०४                ६४३