पाच महिन्यांत ३१० जणांचे परवाने रद्द

भाडे नाकारणे, उद्धट वागणे अशी वर्तणूक करणाऱ्या मुंबई उपनगरांतील रिक्षाचालकांची ‘मुजोरी’ आरटीओकडून उतरविण्यात आली आहे. १ एप्रिल ते २० सप्टेंबपर्यंत केलेल्या कारवाईत ३१० जणांचा चालक तसेच रिक्षा परवाना अंधेरी आरटीओकडून निलंबित करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकाबाहेर आलेल्या प्रवाशाने रिक्षा पकडताच काही चालकांकडून प्रवाशाला निश्चित ठिकाणी पोहोचविण्यात येते. परंतु काही चालक मीटरपेक्षा जादा भाडे मागतात. त्याशिवाय प्रवाशाला रिक्षात बसू देत नाहीत. एखाद्या प्रवाशाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतरही त्या प्रवाशाकडून जादा भाडय़ाची मागणी केली जाते. अशा वेळी रिक्षाचालक व प्रवाशामध्ये खटकेही उडतात. प्रवाशासोबत उद्धटही वागण्याचे अनेक प्रकार होत असतात. मुंबई उपनगरातील रिक्षाचालकांच्या या मुजोरीविरोधात अंधेरी आरटीओकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनंतर १ एप्रिल २०१८ पासून भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, उद्धट वागणे याविरोधात कारवाईला सुरुवात केली. आतापर्यंत एक हजार ५६८ चालक दोषी आढळले असून यातील १७७ चालकांचा रिक्षा परवाना व १३३ जणांचा चालक परवाना निलंबित झाला आहे. तर उर्वरित चालकांकडून १९ लाख ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

अंधेरीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी भाडे नाकारणे यासह अन्य काही तक्रारी चालकांविरोधात प्रवाशांनी केल्याचे सांगितले. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. पहिला गुन्हा घडल्यास ३० दिवसांपर्यंत लायसन्स व परवाना निलंबित होतो. त्यानंतर मात्र यात वाढ होत जाते. जास्तीत जास्त चार महिने निलंबनाची कारवाई होत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

रिक्षाचालकांच्या मुजोरीची ठिकाणे

* वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर

* अंधेरी पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर

* मुंबई विमानतळाबाहेर

* जोगेश्वरी पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर