गेल्या दोन आठवडय़ांपासून मुंबईतील उपचाराधीन रुग्णसंख्येतून तब्बल ३१ हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. परिणामी, विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९,३२५ वर घसरली आहे. वगळण्यात आलेल्यांपैकी काही रुग्णांची नोंद दोन वेळा झाली होती, तर काही रुग्ण मुंबईबाहेरील असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत होती. त्याचबरोबर रुग्ण करोनामुक्तांच्या प्रमाणातही वाढ झाली, मृत्यूदरही घसरू लागला होता. त्याचबरोबर गेल्या दोन आठवडय़ांपासून उपचाराधीन रुग्णसंख्येतून मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची नावे कमी करण्यात येत असल्याचे पालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या करोनाविषयक अहवालातील आकडेवारीवरुन निदर्शनास आले आहे.

पालिकेच्या अहवालानुसार, ११ ते २१ नोव्हेंबर या काळात सुमारे ३१ हजार ७११ रुग्णांची नावे उपचाराधीन रुग्णसंख्येतून वगळण्यात आली आहेत. यापैकी काही रुग्णांची दुहेरी नोंद झाली होती, तर काही रुग्ण मुंबईच्या बाहेरील असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांची नावे मुंबईतील उपचाराधीन रुग्णांमधून वगळण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

झाले काय?

* मुंबईमधील करोना रुग्णांबाबतचा अहवाल पालिकेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) उपलब्ध होतो. आसपासच्या शहरांमधून मुंबईत उपचारासाठी काही रुग्ण आल्याचे आणि त्यांची नोंद मुंबईतील रुग्णांबरोबर झाल्याचे, तसेच काही रुग्णांची दुहेरी नोंद झाल्याचे आयसीएमआरच्या निदर्शनास आले आहे.

* आयसीएमआरकडून त्याबाबतची माहिती पालिकेला देण्यात आल्यानंतर या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांमधून कमी करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. विदेशातून अथवा परराज्यांतून विमानाने मुंबईत आलेल्यांची तपासणी आणि चाचणी करण्यात आली.

* त्यापैकी काही जणांना करोना झाल्याचे निदर्शनास आले. त्यांची नोंद मुंबईतील रुग्णांबरोबर झाली. मात्र आता त्यांची नोंद मुंबईतून वगळून त्यांच्या संबंधित शहरातील रुग्णसंख्येत समाविष्ट करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.