सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येणाऱ्या तीन हजार ४५० घरांच्या स्वप्नपूर्ती संकुलातील ३१५४ घरांची सिडकोने शनिवारी काढलेली सोडत सुरळीत पार पडली. अत्यंत पारदर्शकरीत्या काढण्यात आलेल्या या सोडतीसाठी माजी न्यायाधीश एस. डी. धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्यात आली होती. पहिल्यांदाच सिडकोच्या वेबसाइटवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सोडत दुपारी साडेतीन वाजता पूर्ण झाली. उत्सुकता असलेल्या ग्राहकांनी सिडको मुख्यालयासमोर गर्दी केली होती.
सिडकोने वर्षांला दहा हजार घरे बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यातील पाच हजार घरे खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येत असून व्हॅलिशिल्प या मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १२२४ घरांची सोडत काढल्यानंतर सिडकोने शनिवारी आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ३१५४ घरांची सोडत काढली. या वेळी निम्म्या जणांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले असून त्यांची सोडतदेखील काढण्यात आली. या घरांसाठी ८६ हजार अर्ज आले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या उपस्थित पार पडलेल्या या सोडतीसाठी बोलविलेले ग्राहकदेखील सोडत काढून आमंत्रित करण्यात आले होते. भाग्यवान ग्राहकांना २० डिसेंबरपासून इरादापत्रे मिळणार असून त्यानंतर त्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. घर न मिळालेल्या ग्राहकांचे नोंदणी शुल्क १० डिसेंबरनंतर अर्ज भरलेल्या बँकेत मिळणार आहे. कमीत कमी १६ व जास्तीत जास्त २४ लाख रुपये किमतीची ही घरे २८० ते ३४० चौरस फुटांची आहेत.