गेल्या वर्षी ३१८७ जणांचा अपघातांत मृत्यू; चार वर्षांत ९ टक्क्यांनी संख्या घटली

दर दिवशी सरासरी दहा मुंबईकरांचा ‘घास’ घेणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या चार वर्षांपासून ही अपघाती मृत्यूंची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीच्या टपावरून प्रवास करताना विजेचा धक्का लागणे, गाडीतून पडून अशा विविध कारणांमुळे गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये ३१८७ जणांचा मृत्यू झाला होता. २०१३ मध्ये ही संख्या ३५१३ एवढी होती. त्यात दर वर्षी सातत्याने घट होत असून अपघात रोखण्यासाठी रेल्वे करीत असलेल्या उपाययोजना फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे सतत अपघात होत असतात. हे अपघात रोखण्याबाबत याआधी संसदेतही चर्चा झाली आहे. भावेश नकाते प्रकरणानंतर रेल्वेने धडा घेत रेल्वे मार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी निम्मे अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना होतात. त्याचा विचार करून रेल्वेने दोन स्थानकांदरम्यान तसेच विविध स्थानकांमध्ये पादचारी पूल उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या साहाय्याने संवेदनशील जागा हेरून तेथे प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून परावृत्त केले जात आहे.

सकाळी व संध्याकाळी भयंकर गर्दीच्या वेळी प्रवासी गाडीतून पडून अपघात होण्याचे प्रकारही घडतात. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या सेवांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच वक्तशीरपणा सुधारण्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये भर दिला गेल्यानेही गाडय़ांमधील गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्याचा परिणामही अपघातांची संख्या कमी होण्यावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उपनगरीय रेल्वे मार्गावर मृत्युमुखी पडणाऱ्यांची सरासरी संख्या आठपर्यंत खाली आल्याचे लोहमार्ग पोलिसांची आकडेवारी दाखवते.

यंदा झालेल्या अपघातांमध्ये ३१८७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २८२५ पुरुष, ३६० महिला आणि दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता पुरुष प्रवाशांच्या मृत्यूंमध्ये कमालीची घट झाली असून मृत्युमुखी पडलेल्या महिला प्रवाशांची संख्या थोडय़ाफार फरकाने सारखीच राहिलेली दिसते.

याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांना विचारले असता मध्य रेल्वे सातत्याने अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्यापासून प्रवाशांना थांबवण्यासाठी आम्ही पादचारी पूल आणि सरकते जिने यांची संख्या वाढवत आहोत. दोन स्थानकांदरम्यानही पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन वर्षांत अशा अनेक कामांना गती मिळेल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

अपघातांची आकडेवारी

 वर्ष      मृत्यू    पुरुष   महिला   तृतीयपंथीय

२०१३  ३५१३   ३१४३    ३६९          ०१

२०१४  ३४२९  २९९८   ४२८         ०३

२०१५  ३३०५  २९३३   ३६७        ०५

२०१६  ३१८७  २८२५   ३६०         ०२

अव्वल पाच अपघातग्रस्त स्थानके (लोहमार्ग पोलीस ठाणी)

स्थानक     २०१३  २०१४  २०१५  २०१६

कल्याण      ८१५   ८५०   ४६७   ४०९

कुर्ला          ७४७   ६८१   ४३२   ३८६

ठाणे            ६४४   ६६५   ३९१   ३५१

बोरिवली     ६३४   ६४९   ३२७   २७९

वसई रोड    ५१२   ५४३   २९१   २४२