महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना तसेच सुरक्षेचे कारण पुढे करीत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी यंदा ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील बार, रेस्तराँ, पब पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास नकार दिला आहे.
नियमाप्रमाणे बार, रेस्तराँ, पब दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील. पंचतारांकित हॉटेलातील रेस्तराँ वा पब तीन वाजेपर्यंत सुरू राहतील, असे स्पष्ट करणाऱ्या सूचना पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
२५ आणि ३१ डिसेंबर रोजी हॉटेलांच्या वेळेत साडेतीन तासांची खास सवलत देण्याच्या प्रस्तावाला शासनाच्या सर्वच संबंधित विभागांनी हिरवा कंदिल दाखविला असला तरी अंतिम निर्णय हा आयुक्तांचा असतो. आयुक्त डॉ. सिंग यांनी ही वेळ वाढविण्यास नकार दिला आहे. २५ डिसेंबरच्या रात्रीही हॉटेल, पब, बार दीड वाजता बंद करण्यात आले. आता ३१ डिसेंबर रोजीही तीच वेळ पाळावी लागणार आहे. या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांच्या या आदेशामुळे हॉटेल मालक अस्वस्थ झाले आहेत. या निर्णयामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनाचाही महसूल बुडणार असल्याचा दावा ‘आहार’ या संघटनेचे सरचिटणीस शशिकांत शेट्टी यांनी केला आहे. २००८ मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीही पाच वाजेपर्यंत हॉटेल उघडी होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.