वाळवीचा विळखा; सर्व उपकरणे नादुरुस्त, वातानुकूलन यंत्रे बंद

संदीप आचार्य, मुंबई</strong>

‘सुरक्षित रक्ता’ची हमी देणाऱ्या ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’च्या अखत्यारीतील ‘जे.जे.महानगर रक्तपेढी’ वाळवीच्या विळख्यात सापडली आहे. ३२ वातानुकूलन यंत्रे आणि रक्ताच्या चाचण्या करणारी यंत्रणाही बंद पडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गंभीर बाब, म्हणजे रक्तदात्यांकडून रक्त काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुईची (लॅन्सेट) मुदत संपली असून, रक्तदात्यांकडून यापुढे रक्त घ्यायचे कसे, असा प्रश्न रक्तपेढीतील तंत्रज्ञांपुढे निर्माण झाला आहे.

संपूर्ण मुंबईची रक्ताची गरज सुमारे अडीच लाख रक्ताच्या पिशव्या इतकी आहे. त्यापैकी २००८ साली सुरू करण्यात आलेल्या जे.जे. महानगर रक्तपेढीची रक्तसाठवण क्षमता ४५ हजार रक्ताच्या पिशव्यांची आहे. शिवाय रक्त विलगीकरणाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात मुंबईच्या रक्ताची व रक्तघटकांची व्यवस्था या रक्तपेढीच्या माध्यमातून करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत या रक्तपेढीतील महत्त्वाची सर्व उपकरणे कालबाह्य़ ठरल्यानंतरही आरोग्य विभागाने नवीन उपकरणे न घेतल्यामुळे रक्ताच्या चाचण्यांपासून आवश्यक त्या सर्व गोष्टी हाताने करण्याशिवाय येथील तंत्रज्ञांपुढे पर्याय उरलेला नाही. रक्तपेढीला वाळवीने पोखरले असून, तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्वत्र वाळवी आणि गळतीमुळे भिंतींवर बुरशी जमा झाली आहे.

रक्त साठवणुकीसाठी आवश्यक ते तापमान टिकविण्यासाठी सक्षम वातानुकूलन यंत्रणा आवश्यक असते. मात्र, येथील ३२ वातानुकूलित यंत्रे बंद अवस्थेत आहेत. याचा गंभीर परिणाम सुरक्षित रक्त जमा करण्यावर होत असून, दोन हजार रक्तांच्या पिशव्या साठवणाऱ्या रेफ्रिजेटरलाही गळती लागल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जिथे रक्तदात्यांकडून रक्त घेण्यात येते तेथील वातानुकू लन यंत्रणा अनेकदा बंदच असते. येथील चारही टीव्ही बंद असून रक्तदानासाठी असलेल्या तीन रुग्णवाहिकांपैकी एक बंद पडलेली आहे, तर उर्वरित दोन्ही रुग्णवाहिकांमधील वातानुकूलन यंत्रणाही बंद आहेत. या रुग्णवाहिका अनेकदा रस्त्यातच बंद पडतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

जे.जे.महानगर रक्तपेढीला तात्काळ भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेईन. मी नुकताच आरोग्य संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला असून, रक्तपेढीच्या दुरवस्थेची मला नेमकी माहिती नाही. मात्र, तेथे भेट देऊन माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणा तात्काळ केल्या जातील.

– डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक