भायखळा येथील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील धोकादायक इमारतीमधील ३२ कुटुंबियांना ऐन दिवाळीमध्ये प्रशासनाने बेघर केले असून रात्री उशीरापर्यंत ही कुटुंबे अग्निशमन दलाच्या वसाहतीमधील मोकळ्या मैदानात बसून होती. एखादी इमारत एका रात्रीत धोकादायक बनते का? असा सवाल करीत या कुटुंबांना दिवाळीची पहिली रात्री मैदानात बसून काढावी लागली. प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल अग्निशमन दालामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भायखळा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून तेथील ‘ए’ विंग अत्यंत धोकादायक असल्याचे अलिकडेच केलेल्या इमारतीच्या संरचनात्मक पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे ‘ए’ विंगमधील ३२ कुटुंबियांना तात्काळ घरे रिकामी करण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले. इतकेच नव्हे तर सायंकाळच्या सुमारास ही इमारत रिकामीही करण्यात आली. या कुटुंबियांची जवळच्याच कमांडिंग सेंटरमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु रात्री उशीरापर्यंत येथील मैदानामध्ये बसून रात्र काढण्याची वेळ या कुटुंबियांवर आली. दरम्यान, दिवाळीपूर्वी आम्हाला स्थलांतरित का करण्यात आले नाही, त्यासाठी दिवाळीचा मुहूर्त का धरण्यात आला, असा सवाल ते करीत आहेत.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेली मांडवी येथील इमारतही धोकादायक बनली होती. साधारण एक महिन्यापूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आली. या इमारतीत २५ कुटुंबे होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मरोळ येथील वसाहतही धोकादायक झाली असून २७ कुटुंबे जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. ही इमारतही रिकामी करण्यात येणार आहे.