मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा शनिवारी करोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यातील ३२ वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा करोनाने बळी घेतला.

करोनाच्या संसर्गामुळे एका तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. करोनाने मुंबई पोलीस दलातील आठ जणांचा बळी घेतला आहे. मुंबई पोलीस दलातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

शाहू नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या या साहाय्यक पोलीस निरीक्षकाला सर्दी-ताप अशी लक्षणे दिसत होती. त्यामुळे १३ मे रोजी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांची करोना चाचणी करण्यात आली. तेव्हापासून ते प्रतीक्षानगर येथील घरीच होते. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मृत्यूनंतर शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचा करोनाचा अहवाल आला. त्यात त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले. त्यांना मधुमेहही होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली आणि श्रद्धांजली अर्पण केली.

*  पुरेशा मनुष्यबळाअभावी ताण

पोलीस दलातील ५५ वर्षांपुढील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकार असलेल्या अधिकाऱ्यांना करोनाची जोखीम अधिक असल्याने रजा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यातच तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने या कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

*  राज्यात ११४० पोलिसांना लागण

पोलीस दलातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यभरात ११४० पोलिसांना संसर्ग झाला आहे. त्यात १२० अधिकारी आणि १०२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १० पोलिसांचा मृत्यू झाला. तसेच आतापर्यंत ३२ पोलीस अधिकारी आणि २३६ कर्मचारी असे २६८ पोलीस करोनामुक्त झाले आहेत. यातील काहीजण विलगीकरणाचा कालावधी संपवून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.