करोना निर्मुलनासाठी जारी प्रतिबंधात्मक उपाय, प्राधिकाऱ्यांचे आदेश धुडकावणाऱ्यांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्य़ांची संख्या शुक्रवारी ५० हजारांपुढे गेली. राज्य पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार टाळेबंदी लागू झाल्यापासून शुक्र वापर्यंत नोंद गुन्हयांत दहा हजारांहून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली, एकूण ३२४२४ वाहने जप्त करण्यात आली तर एक कोटी ८२ लाखांचा दंड बजावण्यात आला.

३० पोलिसांना लागण

राज्य पोलीस दलातील ७ अधिकारी आणि २३ अंमलदारांना करोनाची लागण झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाने शुक्र वारी जारी केली. यातील सर्वाधिक करोना बाधीत पोलीस मुंबईत नेमणुकीस आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांसह सामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरी राहाण्याच्या किंवा वैद्यकीय चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांवरील हल्ल्याची शंभरी

करोना निर्मुलनासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर नागरिकांचे हल्ले सुरूच आहेत. शुक्रवापर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांच्या १०२ घटना राज्याच्या विविध भागात नोंद केल्या गेल्या. याप्रकरणी  १६२ जणांना अटक केली गेली.