जांभोरी मैदानातील कृत्रिम तलावात ३२६ घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने जांभोरी मैदानात उभारलेल्या खास कृत्रिम तलावात विसर्जनासाठी भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. सोमवारी एकाच दिवसात तब्बल सव्वा तीनशे गौरी गणपतींचे विसर्जन झाले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे समुद्राच्या पाण्याचे आणि समुद्री जीवांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेने अमोनिया-बाय-काबरेनेट (बेकरीत वापरला जाणारा खाण्याचा सोडा) आणि पाण्याचे मिश्रण असलेला तलाव तयार केला होता. या तलावात ४८ तासात मूर्तीचे विघटन होते. मुंबई महानगरपालिकेने देखील पहिल्यांदाच हा प्रयोग केला. वरळीच्या जांबोरी मैदानात हा तलाव उभारण्यात आला होता.

या तलावाचे दोन भाग करण्यात आले होते. एका भागात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे आणि दुसऱ्या भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. बाजूला एक पत्र्याची टाकी ठेवण्यात आली. यात अमोनिया-बाय-काबरेनेट (ए.बी.सी ) आणि पाण्याचे मिश्रण ठेवले होते. नेहमीच्या विसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्या टाकीत विघटनासाठी ठेवण्यात येत होत्या.

येथे प्रत्येक गणपतीची नोंदणी करण्यात येत होती. नोंदणीनंतर प्रत्येकाला ए.बी.सी. टाकीची माहिती देण्यात येत होती. विसर्जनानंतर प्रत्येकाकडून अभिप्राय पत्र भरून घेण्यात येत होते, जेणे करून पुढच्या वर्षी नियोजनात काय बदल करता येतील, अशी माहिती प्रमोद दाभोळकर यांनी दिली.

३२६ मूर्तीचे विसर्जन

सोमवारी रात्री साधारण एक वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते. एकूण ३२६ मूर्तीचे विसर्जन झाले, त्यात २८२ गणेश आणि ४४ गौरी मूर्तीचा समावेश होता. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन ४८ तासात होत असले तरी हे मिश्रण साधारण दर एक तासाने ढवळावे लागते. यासाठी पालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. दुसऱ्या दिवशीसुद्धा विघटनाची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती पालिकेचे कर्मचारी अनिल नाईक यांनी दिली.

गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रात गेल्यामुळे समुद्री जीवांना बाधा पोहोचते. यामुळे कोळी समाजाने पुढाकार घेऊन कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सुरुवात केली आहे.

– अभिजीत पाटील , अध्यक्ष, वरळी सागरी कोळी महोत्सव समिती

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या आकर्षक आणि स्वस्त असतात. त्यामुळे लोकांचा या मूर्ती खरेदी करण्याकडे अधिक भर असतो. मात्र त्यांच्या विघटनासाठी राबवलेला हा प्रकल्प खूप चांगला आहे, त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.

– चंदन पाटील, भाविक