मॅनहोल, नाले, समुद्रात पडून मृत्यू होण्याच्या ६३९ घटना; १६७ जखमी

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गेल्या पाच वर्षांमध्ये उघडे मॅनहोल आणि नाल्यांमध्ये पडून ३२८ जणांना प्राण गमवावे लागले असून १६७ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या काळात मॅनहोल, नाल्यात एखादी व्यक्ती पडल्याच्या तब्बल ६३९ घटना घडल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत हाती आलेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे.

मुंबईमध्ये २०१३ पासून २०१८ या काळात मॅनहोल, नाले आणि समुद्रात व्यक्ती पडल्याच्या ६३९ घटना घडल्या. या घटनांमध्ये सुमारे ३२८ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईमध्ये आपत्कालीन परिस्थितीत किती दुर्घटना घडल्या आणि त्यात किती जणांना प्राण गमवावे लागले, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून माहिती अधिकाराखाली मिळाली.

या माहितीतून २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या काळात समुद्र, नाला, नदी, विहीर, खाडी, खाणी आणि मॅनहोलमध्ये व्यक्ती पडण्याच्या ६३९ घटना घडल्या. या घटनांमध्ये ३२८ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. मृतांमध्ये ९१ महिला आणि २३७ पुरुषांचा समावेश आहे. तसेच १६७ जखमींमध्ये ४५ महिला आणि १२२ पुरुषांचा समावेश आहे.

सर्वाधिक घटना २०१७ मध्ये घडल्या असून या वर्षांत घडलेल्या १५४ घटनांमध्ये २५ जण जखमी, तर ७८ जण मृत्युमुखी पडले आहेत. या घटनांमधील मृतांमध्ये ७० महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये २० महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या तुलनेत २०१७ मध्ये मोठय़ा प्रमाणावर महिला दुर्घटनाग्रस्त झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.