मुंबईची रेल्वे ही मुंबईची लाइफलाइन म्हटली जाते. मात्र गेल्या चार दिवसात याच लाइफलाइनने एक दोन नाही तर तब्बल ३३ बळी घेतले आहेत. विविध घटनांमध्ये लोकल अपघातांतून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ ऑक्टोबरला ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. १७ ऑक्टोबरला ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी सातजणांची ओळख पटली आहे तर दोघांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. १६ ऑक्टोबरला एकूण १० जणांचा बळी गेला आहे. ज्यामध्ये एका महिलेचा आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. १५ ऑक्टोबरला एकूण ६ जणांचा बळी गेला आहे.

याच घटनांमध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. मागील चार दिवसात एकूण ३९ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य-पश्चिम आणि हार्बर रेल्वेकडून सातत्याने सुरक्षित प्रवास करण्याच्या सूचना दिल्या जात असतात. मात्र मुंबईकरांचा प्रवास जीव मुठीतच धरून होतो ऑफिसला पोहचण्याच्या वेळा आणि घरी जाण्यांच्या वेळांमध्ये कायमच गर्दी असते त्यामुळे मुंबईकरांना त्यांचे प्राण गमावावे लागत आहेत. मुंबई ट्रेन अपडेट या फेसबुक पेजवर या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. याआधी गेल्या आठवड्यातही अनेक मुंबईकरांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. आता पुन्हा एकदा गेल्या चार दिवसात म्हणजेच सोमवार ते गुरुवार या चार दिवसात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.