प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या संशयितांचा आकडाही मोठा आहे. आतापर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी ३३ लाख ७१ हजारांहून अधिक संशयित विलगीकरणातून मुक्त झाले आहेत. मात्र, करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आजघडीला सव्वाचार लाखांहून अधिक व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर, अंतर नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर संसर्ग पसरू नये म्हणून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे दोन गट करण्यात आले. बाधिताच्या अतिजवळच्या व्यक्तीचा अतिजोखमीच्या गटात, तर तुलनेत कमी संपर्कात आलेल्यांचा कमी जोखमीच्या गटात समावेश करण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीनुरूप या दोन्ही गटांतील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यासाठी करोना काळजी केंद्रे उभारण्यात आली.

संसर्गावर नियंत्रण मिळावे यादृष्टीने करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मोठय़ा संख्येने शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत ३८ लाख ४ हजार १७० संशयित रुग्ण पालिकेला सापडले. यापैकी १६ लाख ४० हजार ७४८ संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर २१ लाख ६३ हजार ४२२ कमी जोखमीच्या गटात होते. शोधमोहिमेत सापडलेल्या ३३ लाख ७१ हजार ११२ संशयित रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला असून विलगीकरणातून ते मुक्त झाले आहेत.

बहुतांश रुग्ण पालिकेच्या करोना काळजी केंद्रात जाण्यास तयार होत नसल्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता. घरामध्ये स्वतंत्र खोली आणि प्रसाधनगृह असल्यास संबंधित संशयित रुग्णास गृह विलगीकरणात राहण्याची मुभा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार आजघडीला तब्बल चार लाख ३२ हजार ५३३ संशयित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र गेल्या आठवडाभरात तब्बल ३३ हजार ७२२ संशयित रुग्ण विलगीकरणातून मुक्त झाले आहेत.

४५ हजार ९६१ इमारती टाळेमुक्त

दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिणामी, टाळेबंद केलेल्या इमारतींची संख्याही कमी होऊ लागली आहे. आजघडीला ६,३२० इमारती करोनाबाधित रुग्णांमुळे टाळेबंद करण्यात आल्या आहेत. तर रुग्ण करोनामुक्त झाल्याने आणि नियोजित काळ पूर्ण झाल्यामुळे ४५ हजार ९६१ इमारती टाळेमुक्त करण्यात आल्या आहेत.