रक्त संकलन आणि शिबिरांतील नियोजनाच्या अभावामुळे दरवर्षी राज्यात हजारो युनिट रक्ताचा अपव्यय होत आहे. यावर्षीही जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत सरकारी व पालिका रक्तपेढय़ांमधील ३३,६४२ रक्तपिशव्या मुदत उलटल्याने वाया गेले आहे.

दरवर्षी राज्याला १२ ते १३ लाख रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. मात्र दरवर्षी मुदत उलटल्याने हजारो युनिट रक्त वाया जाते. राज्यातील ७३ पालिका व सरकारी रक्तपेढय़ांच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ३३,६४२ युनिट रक्त म्हणजे ११,७७४ लिटर रक्त वाया गेले आहे. चेतन कोठारी यांनी हे धक्कादायक सत्य माहिती अधिकारातून उघड केले आहे. या माहिती अधिकारात नमूद केल्याप्रमाणे १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत पालिका व सरकारी रक्तपेढय़ांमध्ये १ लाख ८५ हजार ८९४ युनिट रक्त जमा झाले असून यातील ३३,६४२ युनिट रक्त मुदत निघून गेल्याने वाया गेले आहे. राज्यभरात एकूण ३२६ रक्तपेढय़ा असून त्यात ७३ रक्तपेढय़ा पालिका व सरकारी आहेत. रक्ताला ३५ दिवसांची आणि रक्तघटकांना ५ दिवसांची मुदत असते. रक्तदानानंतर साधारण ३५ दिवसात रक्त वापरले जाणे आवश्यक आहे. अथवा ते वाया जाते.

रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारकडून केलेल्या योजना फोल ठरत असून रक्ताचा अपव्यय रोखण्यासाठी रक्तदान शिबिरांबाबत नियमावली आखण्याची आवश्यकता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. अशावेळी रक्तपेढय़ांमध्ये पुरेसे रक्त असतानाही रक्त शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रत्येक रक्तपेढय़ांना रक्तसंकलनाची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र एकाच ठिकाणी शेकडो रक्तपेढय़ा एकत्र येऊनही रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्ताचा अपव्यय रोखण्यासाठी रक्तदानामध्ये सातत्य आवश्यक आहे.