संदीप आचार्य

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात असलेल्या आरोग्य भवनातील ३५ कर्मचारी करोनाबाधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य आयुक्त, आरोग्य संचालक, सहसंचालक, उपसंचालक अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतचा कारभार तसेच आरोग्यासंबंधी विविध योजनांचे कामकाज आरोग्य भवनातून चालविले जाते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील काही कर्मचाऱ्यांना पुणे येथील कार्यालयात पाठविण्यात आले. त्यामुळे मुंबईतील आरोग्य भवनात जवळपास ५२५ कर्मचारी आणि डॉक्टर तैनात होते. यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानां’तर्गत ३०० कर्मचारी आणि डॉक्टर, तर आरोग्य विभागाचे २२५ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून यातील बरेच कर्मचारी घरी आहेत. मात्र, आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार व आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह २५ डॉक्टरांनी गेल्या तीन महिन्यांत जवळपास एकही दिवस सुट्टी घेतली नाही.

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून काही कर्मचारी कामावर हजर झाले, तर अनेकांनी आपण गावाला असल्याने येऊ शकत नसल्याचे कारण पुढे केले. नियमानुसार मुख्यालय सोडताना संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही बहुतेकांनी तशी परवानगी घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यांना विचारले असता अनेक कर्मचारी करोनाबाधित झाल्याचे त्यांनी मान्य केले.

मात्र नेमक्या किती कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली ते स्पष्ट केले नाही. सुरुवातीच्या काळात दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एक दिवसाआड कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. प्रत्येक विभागप्रमुखासाठी दोन-तीन कर्मचारी तसेच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच सध्या बोलविण्यात येत असून रोज किमान ७० कर्मचारी कामावर येतात, असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त काम : आरोग्य भवनातून न्यायालयातील खटल्यांना उत्तरे तयार करून देणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतचे कामकाज तसेच विविध आरोग्य सेवांच्या कामांचा आढावा घेणे व कामांना गती देण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना दररोज रात्री उशिरापर्यंत थांबून काम करावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.