मुंबईतील कफ परेड येथे ३५ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चार जणांनी मारहाण करत बुटावरील थुंकी चाटायला लावल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कफ परेडमधील मार्केट परिसरात शुक्रवारी संध्याकाळी कासिम शेख या तरुणावर चार जणांनी हल्ला केला. वैयक्तिक वादातून त्या चौघांनी हा हल्ला केला होता. हल्ल्यानंतर चौघांपैकी एक जण बुटावर थुंकला आणि त्याने कासिमला बुट चाटायला भाग पाडले. यानंतर चौघांनीही कासिमला सोडून दिले. सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याने कासिमला मानसिक धक्का बसला. त्याने घरी परतल्यावर रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी कासिमने आत्महत्या केल्याचे समोर आले.

आत्महत्येपूर्वी कासिमने सुसाईड नोटही लिहीली होती. यात त्याने आत्महत्येसाठी इस्माइल शेख (४७), कारिया पावसे (३५), अफजल कुरेशी (४४) आणि अकबर शेख (३५) या चौघांना जबाबदार ठरवले होते. पोलिसांनी या चौघांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. नेमक्या कोणत्या वादातून ही घटना घडली हे अजून समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेवर संताप व्यक्त होत आहे.