आता महाव्यवस्थापकांनी विविध महाविद्यालयांतील एनएसएस (राष्ट्रीय सेवा संस्था) शाखांसह संपर्क साधत प्रवाशांना आवाहन करण्यासाठी या विद्यार्थ्यांची मदत घेण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार मुंबईतील तब्बल ३५ महाविद्यालयांतील एनएसएसचे १०-१० विद्यार्थी बेस्टच्या सर्व २६ आगारांबाहेर ४ ते ७ ऑगस्ट यांदरम्यान विविध कार्यक्रम करतील. यात पत्रके तयार करण्यापासून बेस्ट उपक्रमाची माहिती देणारी पथनाटय़े सादर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यात येतील. मात्र मुख्य भर प्रवाशांना बेस्टनेच प्रवास करा, असे आवाहन करण्यावर ठेवण्यात येईल.
डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या प्रवासी संख्येला लागलेली गळती थांबवण्यासाठी आता विविध महाविद्यालयांतील एनएसएसचे विद्यार्थी पुढे सरसावणार आहेत. बेस्टच्या ‘प्रवासी वाढवा’ मोहिमेचा भाग म्हणून आता ४ ते ७ ऑगस्टदरम्यान हे विद्यार्थी बेस्टच्या विविध आगारांबाहेर बेस्टच्या योजनांची माहिती प्रवाशांना देणार आहेत. तसेच शेअर रिक्षा किंवा टॅक्सी यांनी प्रवास करण्याऐवजी बेस्टचा पर्याय निवडा, असे आवाहनही हे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी मुंबईतील तब्बल ३५ महाविद्यालयांतील एनएसएस शाखांतील प्रत्येकी १० विद्यार्थी सज्ज होणार आहेत.
एके काळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेतील मेरुमणी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला सध्या प्रचंड गळती लागली आहे. गेल्या दोन वर्षांत बेस्टची प्रवासी संख्या ४५ लाखांवरून ३० लाखांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे हा घसरणारा डोलारा सांभाळण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी विविध प्रयत्न सुरू केले आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून मध्यंतरी बेस्टचे तिकीट तपासनीस, निरीक्षक आदी कर्मचारी आगारांबाहेर कण्र्यातून ओरडून प्रवाशांना बेस्टच्या विविध योजनांची माहिती देत प्रवाशांनी बेस्टनेच प्रवास करावा, असे आवाहन करत होते.
महाव्यवस्थापकांच्या डोक्यातील हे सर्वच उपक्रम चौकटीबाहेरचे आहेत. ते नक्कीच चांगले आहेत. मात्र त्याबाबत महाव्यवस्थापक समिती सदस्यांना का अंधारात ठेवतात, हे कोडे आहे. हे उपक्रम समितीपुढे मांडले, तर त्यात चांगल्या सूचनांची भर पडून अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्यास मदत होईल, असे मत बेस्ट समितीतील मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी व्यक्त केले.
तसेच केवळ प्रवाशांना आवाहन करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी उत्तम काम करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.