मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या वुहान येथून आलेले ३६ महाराष्ट्रीय नागरिक १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. १४ दिवस हे रहिवाशी विलगीकरण केंद्रात होते. त्यांना करोना विषाणूची लागण झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ६४५ भारतीयांना वुहानमधून आणण्यात आले होते. त्यांना नवी दिल्लीतील आयटीबीपी आणि मानेसर येथील आर्मी कँप येथे १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यातील महाराष्ट्रातील ३६ जण  त्यांच्या गावी परतत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत ७१ जणांना भरती करण्यात आले आहे. चाचणीनंतर ‘करोना’ची लागण झाली नसल्याचे एनआयव्ही संस्थेने स्पष्ट केल्यामुळे यातील ६९ जणांना घरी सोडण्यात आले असून २ जण मुंबईत उपचार घेत आहेत.