अनधिकृत बांधकामांसाठी लाच मागितल्याच्या प्रकरणाची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनंजय बागाईतकर यांच्यासह ३७ पोलिसांना अचानक निलंबित करण्यात आल्याने नेहरूनगर पोलीस ठाणे एकदम रिकामे झाले. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी त्वरीत शस्त्रास्त्र विभागातील पोलिसांना नेहरूनगर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी लाच मागितल्याचे प्रकरण लज्जास्पद असल्याची कबुली मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. परंतु त्याचबरोबर या पोलिसांना लालूच दाखवून बोलावले असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
चेंबूर येथे एका निर्वासित छावणीतील घर प्रकाश नवल यांनी विकत घेतले होते. त्याच्या दुरुस्ती आणि बांधकामाला पालिकेने परवानगी नाकारली होची. त्या कामासाठी पोलिसांनी नवले यांच्याकडे लाच मागितली होती. कुल्र्याच्या कामगार नगर येथे राहणारे नवल यांचे मित्र कासम खान यांनी लाचखोर पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या रिझवान या मुलाने ही मोहीम सुरू केली. ९ मार्च ते २६ मार्चपर्यंत जे पोलीस कर्मचारी पैसे घेण्यासाठी आले त्या सगळ्यांची चित्रफित रिझवानने तयार केली. ही चित्रफीत त्याने पोलीस आयुक्तांना तसेच लोकायुक्तांनाही दिली होती. परंतु बुधवारी ही चित्रफित वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतरच खळबळ उडाली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्र्यानी बागाईतकर यांच्यासह या सर्व ३७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. एकदम ३७ पोलीस कर्मचारी निलंबित झाल्याने नेहरूनगर पोलीस ठाणे रिकामे झाले होते.  निलंबित झालेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अपवाद वगळता कुणी अधिकारी नसल्याचे पोलीस उपायुक्त लख्मी गौतम यांनी स्पष्ट केले.
असे झाले स्टींग
कासम खान यांनी निर्वासितांच्या छावण्यांना परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात जनहित याचिकाही दाखल केली आहे. कामगार नगर येथील खंडोबा मंदिरासमोरील चाळीत ते भाडय़ाच्या घरात राहतात.
रिझवानने स्टिंग ऑपरेशन करताना पद्धतशीरपणे स्टिंग ऑपरेशन केले. ९ मार्च पासून २६ मार्चपर्यंत छुप्या कॅमेऱ्याने हे ऑपरेशन सुरू होते. त्याच्या एकूण २२ सीडी त्यांनी तयार केल्या आहेत. पैसे घेण्यासाठी येणाऱ्या पोलिसांच्या नोंदी ठेवण्यासाठी त्याने एकूण चार डायऱ्या ठेवल्या होत्या. त्यात किती वाजता किती पोलीस आले, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक नोंदवून ठेवण्यात येत होता. पोलिसांना आतापर्यंत एकूण ४० हजार रुपयांची लाच दिल्याचे त्यांनी सांगितले.
शंभरहून अधिक पोलीस येऊन गेल्याचे रिझवानने सांगितले. मुंबई पोलिसांनी त्याला संरक्षण देऊ केले होते. पण आपल्याला मुंबई पोलिसांचे संरक्षण नको, इतर कुणचेही चालेल असे त्याने सांगितले. आमिष दाखवून पोलिसांनी बोलावल्याचे पोलीस आयुक्तांनी वक्तव्य केल्याने कासम संतप्त झाले असून आम्हाला उद्या काहीही धोका होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ही घटना लज्जास्पद – आयुक्त
एवढय़ा मोठय़ा संख्येने पोलिसांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असून ही घटना लज्जास्पद असल्याची कबुली पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिली. या प्रकरणी तपासानंतर दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. परंतु ही चित्रफित पाहता या पोलिसांना आमिष दाखवून बोलावले असावे अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. बागाईतकर यांची पोलीस उपायुक्तांमार्फत विभागीय चौकशी तसेच या पोलिसांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.