१५ दिवसांत ३६ रुग्णांना लागण; कुर्ला परिसरातील काविळीची साथही कायम

मुंबई : विलंबाने आलेला पाऊस आणि सतत बदलते हवामान यांमुळे जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढला आहे. गेल्या १५ दिवसांत पालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या ३६ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत स्वाइन फ्लूच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नसताना यंदा या आजाराचा प्रभाव वाढल्याने पालिकेचे आरोग्य अधिकारीही चिंतेत आहेत. दरम्यान, कुर्ला परिसरातील काही भागांत असलेली काविळीची साथ अजूनही कायम असून जुलै महिन्याच्या १५ दिवसांत येथून काविळीचे ६३ रुग्ण आढळले आहेत.

वातावरणामधील दमटपणा वाढत चालला की विषाणूजन्य आजारांच्या वाढीस पोषक असे वातावरण निर्माण होते. यावर्षी मान्सूनने जूनच्या शेवटच्या आठवडय़ात हजेरी लावली. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले. वाढलेल्या पावसानंतर स्वाइन फ्लूची साथ शहरात पसरत चालली आहे. जुलै महिन्यात फ्लूने डोके वर काढले असून आत्तापर्यंत ३६ रुग्णांना लागण झाली आहे. गोवंडी भागातील २६ वर्षीय दानिश्ता खान या महिलेचा स्वाइन फ्लूने रविवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या संदर्भात पालिकेच्या समितीचा अहवाल अजून येणे बाकी आहे. त्यामुळे हा अजूनही स्वाइन फ्लूचा संशयित मृत्यू असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेच्या एल वार्डमध्ये मार्च महिन्यापासून थैमान घालत असलेली काविळीची साथ अजूनही नियंत्रणात आलेली नाही. जून महिन्यात या भागात १६९ रुग्णांना काविळीची बाधा झाली होती. तर जुलैमध्ये ६३ काविळीचे रुग्ण आढळले आहेत. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत या भागात ३६७ रुग्णांना काविळीचा प्रादुर्भाव झाला आहे, तर संपूर्ण शहरात या काळात ७१८ रुग्णांना काविळीची लागण झाल्याची नोंद आहे. शहराच्या तुलनेत निम्मे रुग्ण याच भागात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

वातावरणातील बदलामुळे दमा, सीओपीडी, मधुमेह इत्यादी आजार असणाऱ्या रुग्णांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या रुग्णांनी या काळात अधिक काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. प्रतिबंधात्मक लस टोचून घेणे फायदेशीर आहे.

– डॉ. ओम श्रीवास्तव, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ

स्वाइन फ्लूची लक्षणे

तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी विविध आजारांचे रुग्ण (१ ते १५ जुलै) हिवताप (१४६), लेप्टोस्पायरोसिस (२१), गॅस्ट्रो (४६७), डेंग्यू (८)