‘मुंबई फर्स्ट’ व ‘फर्स्ट अँड मेकिंग ए डिफरन्स’ या संस्थांची योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वेनेही ‘स्वच्छ भारत, स्वच्छ रेल्वे’ या जोडमोहिमेतून पुढाकार घेतला आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून मुंबईतील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत रेल्वेसह स्थानक सुशोभिकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. शनिवार, २ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या या मोहिमेद्वारे एकूण ३६ स्थानकांमध्ये विविध चित्रे काढणे, स्थानकांच्या भिंती स्वच्छ करणे आदी गोष्टी होणार आहेत. त्यासाठी विविध कला महाविद्यालये, महाविद्यालये यांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मुंबई फर्स्ट आणि फर्स्ट अँड मेकिंग ए डिफरन्स या दोन सेवाभावी संस्थांनी याआधी बोरिवली स्थानकात अशा प्रकारे स्थानक सुशोभिकरणाचे काम केले आहे. बोरिवली येथे पादचारी पुलांच्या जिन्यांवर रंगिबेरंगी चित्रे चितारणे, स्थानकातील मोकळ्या जागेत बोरिवलीतील प्रेक्षणीय स्थळे किंवा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणारे चित्र काढली आहेत. त्यातूनच स्फूर्ती घेत आता हा कार्यक्रम मोठय़ा स्तरावर राबवण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाचे मोलाचे सहकार्यही लाभणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल आणि पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांच्या अनेक बैठकाही झाल्या आहेत. आता १ ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू होणार असून ३६ स्थानके सुशोभित होतील.

सुशोभिकरण कसे होणार?

स्थानकांचे सुशोभिकरण करताना सर्वप्रथम स्थानकांच्या भिंती, पादचारी पूल, छत आदी गोष्टी स्वच्छ केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक स्थानकाच्या उपनगराचे वैशिष्टय़ लक्षात घेऊन त्या स्थानकात कोणती चित्रे चितारली जातील, हे ठरवले जाणार आहे. (उदा. दादर स्थानकात शिवाजी पार्क, चैत्यभूमी, कबुतरखाना आदी प्रेक्षणीय स्थळे) ही चित्रे भिंती, मोकळ्या जागा, पादचारी पुलांच्या पायऱ्या आणि छत येथे चितारली जातील. त्यामुळे या स्थानकांना एक वेगळीच झळाळी प्राप्त होणार आहे. यासाठी विविध कला महाविद्यालये तसेच महाविद्यालये यांतील विद्यार्थी, या दोन स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आदी स्वयंसेवेने सहभाग घेणार आहेत. त्याशिवाय स्थानकांमध्ये रंगरंगोटीसाठी लागणारा रंग एशियन पेण्ट्स या कंपनीकडून पुरवण्यात येणार आहे.

कोणती स्थानके?

चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्निरोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मशिद, सँडहर्स्ट रोड, रे रोड, करीरोड, चिंचपोकळी, विक्रोळी, घाटकोपर, दादर, माटुंगा, शीव इत्यादी.