३७ हजार मजुरांचे स्थलांतरासाठी अर्ज; श्रमिकांचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाची भीती आणि टाळेबंदीमुळे ओढवलेली बेरोजगारी यामुळे मजूरवर्ग मोठय़ा प्रमाणात परराज्यांतील आपापल्या गावाकडे प्रयाण करत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत मोठय़ा प्रमाणात श्रमिकांचा तुटवडा निर्माण होणार आहे. मुंबईतील बांधकाम उद्योगांपासून विविध प्रकल्पांच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक असलेला मजूर वर्ग कमी होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील मजुरांच्या निदर्शनांमुळे चर्चेत आलेल्या बेहरामपाडा या परिसरातूनच तब्बल ३७ हजार स्थलांतरितांचे आपापल्या प्रांतात जाण्यासाठी अर्ज आले आहेत.

टाळेबंदीमुळे विविध भागात अडकून पडलेल्या परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ांची सोय करण्यात येत आहे. त्यासाठी मजुरांची नोंद त्यांनी के लेल्या अर्जाद्वारे मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये के ली जात आहे. पालिकेच्या प्रभाग क्रमांक ९६ मध्ये असलेल्या बेहरामपाडय़ातून निर्मलनगर पोलीस ठाण्यात ३७ हजार अर्ज जमा झाले आहेत.

एप्रिल महिन्यात वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीय कामगारांनी आपापल्या राज्यात परत जाण्यासाठी धरणे धरले होते. त्याचे पडसाद देशभर उमटले.

हे बहुतेक कामगार बेहरामपाडय़ातील होते. येथे घराघरात कारखाने आहेत. कपडे, पर्स, बॅगांचे बरेच उद्योग चालतात. टाळेबंदी वाढू लागल्याने या कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. या भागातही करोनाने शिरकाव के ला आहे. अर्थात इतर झोपडपट्टय़ांच्या तुलनेत येथे करोनाचे रुग्ण कमी आहेत, असे स्थानिक नगरसेवक हलीम खान यांनी सांगितले.

सर्वात लहान प्रभाग

वांद्रे न्यायालय ते वांद्रे स्टेशन असा पसरलेला प्रभाग क्र मांक ९६ मध्ये अंदाजे ७० हजार लोकसंख्या आहे. त्यापैकी निम्मी लोकसंख्या ही परप्रांतीय मजुरांची आहे. एकावर एक अशा दुमजली, तीन मजली कच्च्या झोपडय़ांमध्ये एकेका खोलीत १०-१२ कामगार राहतात. लोकसंख्येची प्रचंड घनता असल्यामुळे पालिके चा हा सर्वात छोटा प्रभाग मानला जातो.

धारावीतूनही २५ हजार अर्ज

धारावी परिसरातूनही मोठय़ा संख्येने परप्रांतीय कामगारांनी अर्ज केले आहेत. धारावी पोलीस ठाण्यात २५ हजार अर्ज, तर शाहूनगर पोलीस ठाण्यात १२ हजार अर्ज आले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाचे ४१ रुग्ण

बेहराम पाडा आणि परिसरात आतापर्यंत ४१ रुग्ण सापडले असून त्यातील १४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.