गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणारी राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली असून राज्यातील ३८ पोलिसांचा त्यात समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात येतात. या वर्षी देशातील ८२४ पोलिसांना ही पदके जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील ३८ पोलिसांचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर आणि हिंगोलीचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेबद्दलचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राज्यातील ३६ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. त्यात मुंबईतील नऊ पोलिसांचा समावेश आहे. मुंबईतल्या पदक मिळवणाऱ्या नऊ पोलिसांमध्ये हेड कॉन्स्टेबल अनिल सालियन (विशेष शाखा), हेड कॉन्स्टेबल, विजय महाडिक (गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे (गुन्हे शाखा), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुगे (मंत्रालय सुरक्षा), हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण दळवी (मुंबई पोलीस आयुक्तालय), वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी विष्णू मालगावकर, पोलीस निरीक्षक रामचंद्र  सावंत (वाहतूक), साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी लावंड (शस्त्रास्त्र दल नायगाव), हेड कॉन्स्टेबल शांताराम डुंबरे (शस्त्रास्त्र दल, नायगाव) आदींचा समावेश आहे.