गेल्या १०० दिवसांत ३९ हजार खासगी टँकरना पाणीपुरवठा; मुंबईच्या पाण्याची परस्पर विक्री करून टँकरमाफिया गब्बर
महापालिकेच्या अंधेरीतील ‘के पूर्व’ विभागातून टँकरद्वारे विकासकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’तून प्रसिद्ध झाल्यानंतर आता संपूर्ण शहरातील पाण्याचा अशा प्रकारे काळाबाजार सुरू असल्याचे उघड होत आहे. एकीकडे आसपासच्या शहरांना टँकरद्वारे पाणी पुरवणे अव्यवहार्य असल्याचे पालिका आयुक्त सांगत असताना गेल्या १०० दिवसांत महापालिकेने तब्बल ३९ हजार खासगी टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाणी ‘टंचाई’ग्रस्त वसाहतींना देण्याच्या नावाखाली पुरवले जात असले तरी प्रत्यक्षात या पाण्याची टँकरमाफियांमार्फत परस्पर विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे.
महानगरपालिकेने २० टक्के पाणीकपात करून बचत करण्याचा मार्ग अनुसरला असला तरी प्रत्यक्षात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांना पाणी बिल दाखवून पालिकेकडून टँकरद्वारे पाणी मिळवता येते. ४० रुपये शुल्क, सुमारे ५० रुपये सेवाकर आणि अन्य शुल्क असे एकूण दीडेकशे रुपये भरून दहा हजार लिटर पाणी मिळवता येते. ग्राहकांनी पाणी बिलाची पावती दाखवल्यानंतरच पालिकेकडून टँकरना पाणी दिल्याचे जलविभागातील अधिकारी सांगतात. मात्र एका पावतीवर किती पाणी द्यावे याचे बंधन पालिकेने घातलेले नाही. याचाच नेमका फायदा पाणी आणि टँकरमाफियांनी उचलला आहे. हे व्यावसायिक कोणाचेही पाणी बिल दाखवून पालिकेकडून अतिशय माफक दरांत पिण्याचे पाणी मिळवून ते पंचतारांकित हॉटेल, आलिशान गृहसंकुले यांना दुप्पट, चौपट दरांत विकत असल्याचे उघड होत आहे.
tab01पालिकेच्याच आकडेवारीकडे लक्ष दिल्यास या संशयाला जागा उरते. १ जानेवारी ते १० एप्रिल २०१६ या १०० दिवसांमध्ये शहरात पालिकेच्या ९१८१ टँकरद्वारे तर खासगी ३८,९९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला. त्यातही मानखुर्द, देवनार, गोवंडी या परिसरात पालिकेकडून ९१५ तर खासगी १३,४२४ टँकरनी पुरवठा झाला. घाटकोपर, अंधेरी, बोरिवली पश्चिम, परळ या विभागातही पालिकेच्या टँकरपेक्षा खासगी टँकरचे प्रमाण अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसते. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही या गोष्टीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या पाणीपुरवठय़ाच्या चौकशीची मागणी केली आहे. एकीकडे पालिकेकडून अशा पद्धतीने अधिकृतरीत्या पाणीउपसा केला जात असतानाच जलवाहिन्या, कूपनलिका, विहिरीतून पाणी चोरूनही विकले जाते, असा आरोप त्यांनी केला.
महानगरपालिकेकडे असलेले टँकर हे अग्निशमन, रुग्णालय अशा अत्यावश्यक सेवांसाठी वापरले जातात. त्यामुळे पालिकेच्या ज्या ग्राहकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही त्यांनी खासगी टँकर आणल्यास अधिकृत बिल पाहून पाणी दिले जाते, असे पालिकेतील जलविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हे पाणी नेमके लाभार्थीनाच मिळते का, याचा तपास करण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेने उभी केलेली नाही. याचाच फायदा घेत मुंबईच्या पाण्यावर टँकरमाफिया गब्बर होत आहेत.

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर