पालिका शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रशासनाने बालवाडीच्या माध्यमातूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी खासगी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने तब्बल ३९४ बालवाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत.

खासगी संस्थांच्या मदतीने सुरू करण्यात येणाऱ्या ३९४ पैकी १३३ बालवाडय़ा मराठी माध्यमांच्या असून बंद पडू लागलेल्या मराठी शाळा वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात बालवाडय़ांची संख्या ९००वर पोहोचेल आणि प्रत्येकी ३० पटक्षमता असलेल्या बालवाडय़ांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २७ हजार इतकी होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यातील ९२ उर्दू माध्यमाच्या, ७८ हिंदी माध्यमाच्या, २५ गुजराती माध्यमाच्या, २३ इंग्रजी माध्यमाच्या, कन्नड व तेलुगु माध्यमाच्या प्रत्येकी १०, तामिळी माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी माध्यमाच्या सहा, तर मुंबई पब्लिक स्कूलअंतगर्त एका बालवाडीचा समावेश आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ४४ बालवाडय़ा ‘एफ उत्तर’ विभागात असतील. त्यामुळे येथील बालवाडय़ांची एकूण संख्या ७६ होणार आहे. या खालोखाल ‘एच पूर्व’ विभागात ३८ बालवाडय़ा सुरु होणार आहे. येथील बालवाडय़ांची संख्या ६० होणार आहे. ‘पी उत्तर’ विभागात ३५ नव्या बालवाडय़ांची सुरुवात होणार असल्याने त्या विभागातील बालवाडय़ांची संख्या ५५ होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी दक्षिण मुंबईतील ‘बी’ व ‘सी’ या दोन विभागांमध्ये यापूर्वी महापालिकेच्या बालवाडय़ा नव्हत्या.  येथे प्रथमच १७ बालवाडय़ा सुरू होणार आहेत.

सध्या पालिकेच्या ५०४ बालवाडय़ा सुरू असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १९० बालवाडय़ा या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ११४ हिंदी माध्यमाच्या, १०७ उर्दू माध्यमाच्या, ६६ इंग्रजी माध्यमाच्या, १० तामिळ माध्यमाच्या आहेत. या खालोखाल गुजराती माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी ६, तर कन्नड व तेलगू माध्यमाच्या प्रत्येकी १ बालवाडी आहे. यांची पटक्षमता १५ हजार १२० आहे.

चित्रे, खेळणी, कार्टुन्स

सर्व बालवाडय़ांमध्ये चिमुकल्यांना आवडतील अशी रंगरंगोरटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पशु-पक्षी, डोंगर-नदी, झाडे, फळे-फुले, सूर्य-चंद्र-तारे यांसारख्या निसर्गातील बाबींसोबतच लहानग्यांचे आवडते कार्टुन्सदेखील बालवाडय़ांच्या भिंतीवर विराजमान होणार आहेत. याचसोबत बालवाडय़ांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आकर्षक खेळणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.