सायन्स म्युझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानकाचे १११७.५ मीटरचे भुयारीकरण

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा बुधवारी पूर्ण झाला. सायन्स म्युझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक दरम्यानचे १११७.५ मीटरचे भुयारीकरण २५७ दिवसांत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून पूर्ण करण्यात आले आहे. तर या कामाच्या अनुषंगाने आता मेट्रो-३ मधील ९६.५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

३३.५ कि.मी.च्या लांबीच्या मेट्रो ३ मार्गात येण्या-जाण्यासाठी अंदाजे ५५ कि.मी.चे भुयारीकरण करण्यात येत आहे. अत्याधुनिक टीबीएम मशीनद्वारे हे काम करण्यात येत आहे. ३३.५ कि.मी.च्या मार्गात भूगर्भात १७ टीबीएम सोडण्यात आल्या आहेत. या टीबीएम मशीन आपले काम पूर्ण करत बाहेर येत आहेत. त्यानुसार बुधवारी रॉबिन्स बनावटीचे तानसा-२ हे टीबीएम मशीन भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण करत बाहेर आले आहे. सायन्स म्युझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी असा १११७.५ मीटरचा असा हा भुयारीकरणाचा टप्पा या मशीनने एकूण ७४५ रिंग्सच्या साहाय्याने २५७ दिवसांत पूर्ण करण्यात आला आहे. हा टप्पा पॅकेज ३ मधील असून हा मेट्रो ३ मधील सर्वात लांब टप्पा आहे. हा टप्पा आव्हानात्मक, अवघड होता. कारण ८० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींची काळजी घेत मार्गी लावावा लागला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या खालून भुयारीकरण करण्यात आले आहे. अत्यंत जिकिरीचे असे हे काम आम्ही अखेर यशस्वीपणे पूर्ण केल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली आहे.