News Flash

राज्यातील ४.३ टक्के लसमात्रा वाया

मर्यादित लसीकरण तसेच एका कुपीत २० मात्रा असल्याचा परिणाम

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात जवळपास ४.३ टक्के लशीचा साठा वाया जात असल्याचे समोर आले आहे. मर्यादित स्वरूपातच सुरू असलेले लसीकरण आणि एका कुपीत अधिक मात्रा असल्यामुळे लस वाया जात आहे. ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा वाया जाणाऱ्या साठय़ाची बचत करण्यासाठी आता एका कुपीत २० मात्रांऐवजी १० मात्राच समाविष्ट करण्यात येणार आहेत.  साधारणपणे १० टक्के साठा वाया जाण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

राज्यात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लसींचा वापर करण्यात येत आहे. कोव्हिशिल्डच्या एका कुपीत ०.५ मिलीलिटरच्या दहा मात्रा तर कोव्हॅक्सिनमध्ये २० मात्रा असतात. एक कुपी उघडल्यानंतर जवळपास चार ते पाच तासांत वापर करणे आवश्यक आहे, अन्यथा उर्वरित लस वाया जाते. सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कमी होता. तेव्हा काही प्रमाणात लशीचा साठा वाया गेला होता. परंतु अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर आता वाया जाणाऱ्या मात्रांचे प्रमाण कमी  आहे.

कोव्हिशिल्डच्या लशीला तुलनेने अधिक मागणी आहे. त्यामुळे ही लस फारशी वाया जात नाही. परंतु कोव्हॅक्सिनला कमी प्रतिसाद आहे आणि एका कुपीत २० मात्रा असल्याने एकदा कुपी उघडली की बहुतांशी लस वाया जाते, अशी माहिती आरोग्य विभागातील  अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत प्रमाण कमी

मुंबईत लसीकरण केंद्रावर मोठय़ा प्रमाणात गर्दी असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण दोन टक्कय़ांहूनही कमी आहे. लस वाया जाऊ नये यासाठी लसीकरण केंद्राना सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. कोव्हिशिल्डमध्ये ०.५ मिलीलिटरच्या अकरा मात्रा आहेत. परंतु दहाच देण्याचे आदेश आहेत. त्यात कधीकधी घेताना कमी-अधिक होण्याची शक्यता असते, त्यामुळे याला वाया जाणे म्हणता येणार नाही, असे मुंबईतील लसीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

काय झाले?: कोव्हॅक्सिनला प्रतिसाद कमी असल्याने कधीकधी एका लाभार्थ्यांसाठीदेखील कुपी उघडावी लागली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. त्यात कोव्हॅक्सिनच्या एका कुपीत कोव्हिशिल्डपेक्षा दुप्पट मात्रा असल्याने ४८ लाभार्थ्यांंना लस दिली तर कोव्हिशिल्डमध्ये केवळ दोन मात्रा वाया जातात. तर कोव्हॅक्सिनमध्ये १२ मात्रा वाया जातात. त्यामुळे जितक्या कमी मात्रा तितके वाया जाण्याचे प्रमाण कमी असल्याचे लसीकरण केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपाय: साधारणपणे १० टक्के लस वाया जाणे गृहीत असते. राज्यात सध्या जवळपास ४.३ टक्के लस वाया जात असून हे प्रमाण तुलनेने कमी आहे. कोव्हॅक्सिनच्या एका कुपीत २० मात्रा असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक  होते. याबाबत कंपनीशी चर्चा केली असून आता दहा मात्रेच्या कुप्या लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुढील काळात वाया जाण्याचे प्रमाण याहूनही कमी होईल,’ असे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. डी.एन. पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:00 am

Web Title: 4 point 3 per cent vaccine wasted in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मराठी ग्रंथालयांना बालवाचकांची प्रतीक्षा
2 डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत उत्तर दाखल करा!
3 मुंबईकरांनो सावधान! शहरात करोना संसर्गाचा वेग वाढला, २४ तासांमध्ये रुग्णसंख्या झाली दुप्पट
Just Now!
X