रेल्वेमार्ग सुरळीत चालावेत यासाठी उन्हातान्हात काम करणाऱ्या गँगमनसाठी रेल्वेमार्ग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. रविवारी सकाळी पावणेदहा वाजता कल्याणच्या पत्री पुलाजवळ डाऊन जलद मार्गावर काम करत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीची धडक लागून हरी नाना, पांडुरंग काशिनाथ, जयवंत गंगाराम आणि दत्ताराम देवजी हे चारही गँगमन जागीच ठार झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने दिले असले, तरी गँगमनच्या अपुऱ्या संख्येबाबत व त्यांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन काय करणार, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे.
हे चौघे सकाळी रूळ दुरुस्तीचे काम करत होते. याच वेळी एक जलद गाडी भरधाव वेगाने आली आणि तिच्या धडकेत चौघांनी प्राण गमावले. त्यांना उपनगरी गाडीची धडक लागली की, कोयना एक्स्प्रेसची, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही होऊ शकला नव्हता. मात्र रेल्वेच्या साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी घटनास्थळी भेट देत तातडीने चौकशीचे आदेश दिले.
गेल्या महिन्यात पहिल्या आठवडय़ात उल्हासनगर-अंबरनाथ या स्थानकांदरम्यान भरधाव रेल्वेने दोन गँगमनना उडवले होते. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर जखमी गँगमन तब्बल सहा तास उपचाराविना तडफडत होता. त्यानंतर दोनच दिवसांत माटुंगा-शीव स्थानकांदरम्यान एका गँगमनला गाडीची धडक लागून तो जखमी झाला होता. त्यानंतर गँगमननी एनआरएमयू या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विभागीय रेल्वे संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढत यापुढे एकाही गँगमनचा जीव गेल्यास काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा दिला होता.
रेल्वेत गँगमनची हजारो पदे रिक्त असल्यामुळे कामाच्या ठिकाणी गाडय़ांवर लक्ष ठेवण्यासाठी गँगमन उपलब्ध नसतात, त्यामुळे हे अपघात होत आहेत. ही पदे भरण्यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार आर्जवे करूनही अद्याप प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही. काम बंद आंदोलन सहज शक्य आहे, मात्र दिवाळीत आम्हाला प्रवाशांना वेठीला धरायचे नाही. यापुढे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर गँगमनचे प्रश्न सोडवले नाहीत, तर आम्ही गंभीर पाऊल उचलू, असा इशारा ‘एनआरएमयू’चे मुंबई विभागाचे सचिव वेणू नायर यांनी दिला.