‘म्हाडा’तर्फे मे महिन्यात घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमधील मीरा रोड येथील घरांच्या यशस्वी अर्जदारांची पात्रता यादी जाहीर करण्यात आली असून तब्बल ७१८ म्हणजेच सुमारे ४० टक्के अर्जदार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे मीरा रोड येथील घरांच्या बाबतीत प्रतीक्षा यादीवरील अनेकांना घरे मिळण्याची शक्यता आहे.
‘म्हाडा’तर्फे मे २०१२ मध्ये मुंबई व कोकण मंडळाच्या मिळून एकूण २५१३ घरांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात मुंबईतील ७८७ घरांचा तर कोकण मंडळाच्या मीरा-भाईंदर येथील १७२६ घरांचा समावेश होता. मीरा-भाईंदर येथील ७०८ घरे अत्यल्प तर १०१८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी होती. विशेष कोटय़ातील घरे वगळता सोडतीमध्ये १६१६ अर्जदार यशस्वी ठरले होते.
यशस्वी अर्जदारांना सोडतीनंतर घर मिळाल्याबाबतची सूचनापत्रे पाठवण्यात आली व कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. पैकी १५४२ अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची छाननी झाली असता यशस्वी अर्जदारांपैकी केवळ ८१९ अर्जदार पात्रता निकष पूर्ण करून पात्र ठरले. तर तब्बल ७१८ अर्जदार हे या ना त्या कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. तर पाच अर्जाची छाननी प्रलंबित आहे.
‘म्हाडा’च्या सोडतीमध्ये जितकी घरे असतात तितके यशस्वी अर्जदार असतातच, शिवाय तितक्याच संख्येने इतर अर्जदारांची प्रतीक्षा यादी निघते. आर्थिक कारणांमुळे वा इतर कारणांमुळे कोणी अपात्र ठरले अथवा कोणी घर घेण्यास असमर्थता व्यक्त केली तर प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना क्रमाने संधी मिळते. मीरा रोड येथील घरे अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील होती. जवळपास ४० टक्के अर्जदार अपात्र ठरल्याने आता मोठय़ा प्रमाणात प्रतीक्षा यादीवरील लोकांनाही घर मिळण्याची मोठी संधी असणार आहे. ‘म्हाडा’ने पात्र व अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर टाकली आहे.