गणिताच्या अभ्यासाचे नियोजन कोलमडल्याने विद्यार्थी हवालदिल

‘एमएस्सी’च्या चौथ्या सत्राच्या गणित विषयाची आधी जाहीर केलेली परीक्षा २७ मे ऐवजी तब्बल ४० दिवस आधीच म्हणजे १८ एप्रिलला सुरू करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनपेक्षित व वादग्रस्त निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

एमएस्सीचे गणित विषयाच्या चौथ्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक २७ जानेवारीला परीक्षा विभागाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. त्यानुसार ही परीक्षा २७ मे रोजी सुरू होणार होती. परंतु, आता ही परीक्षा ४० दिवस आधीच म्हणजे १८ एप्रिलपासून सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत.

मुळात अवघा २० ते ३० टक्केच निकाल असलेला गणितासारखा विषय घेण्याकडेच विद्यार्थ्यांचा कल नसतो. त्यातून आता त्यांना वेळापत्रकाकरिताही संघर्ष करावा लागतो आहे. म्हणून अनेक अध्यापकांनीच विद्यार्थ्यांसोबत परीक्षा आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याची मागणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख आणि परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांच्याकडे केली आहे. तसेच, २९ मार्चला कुलगुरूंची भेट घेऊन विद्यार्थ्यांची अडचण त्यांच्या कानावर घातली. त्यात कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, आठवडा उलटला तरी नवे वेळापत्रक रद्द करण्यात न आल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

एमएस्सीची एटीकेटीची परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू होते. ती २० एप्रिलपर्यंत चालेल. त्यामुळे, एटीकेटीचा अभ्यास करायचा की मुख्य परीक्षेचा, या विचाराने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

त्यातच तब्बल ४० दिवस परीक्षा मागे आल्याने अभ्यासाचे नियोजनच पुरते कोलमडून पडेल, अशी भीती एका विद्यार्थ्यांने व्यक्त केली. परीक्षा शक्यतो पुढे ढकलल्या जातात. पण वेळापत्रक बदलून परीक्षेच्या तारखा मागे घेण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.

विभागाचीच सूचना कारणीभूत

परीक्षेचे वेळापत्रक बदलाला विद्यापीठाचाच गणित विभाग कारणीभूत ठरला आहे. या विभागाने वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने परीक्षेच्या तारखा आधीच्या करण्यात याव्यात, असे परीक्षा नियंत्रकांना कळविले. त्यामुळे आपण वेळापत्रक बदलले, असे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा वेळापत्रक बदलण्याला विरोध आहे. त्यामुळे, आम्ही पुन्हा आढावा घेऊन जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, या दृष्टीने नव्याने वेळापत्रक जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एक-दोन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी

अवघ्या एक-दोन विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी जाता यावे यासाठी त्यांच्या सोयीने वेळापत्रक बदलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. परंतु, त्याचा फटका परीक्षा देणाऱ्या इतर सुमारे ३०० विद्यार्थ्यांना बसतो आहे.