ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे शहराकडे धाव; पालिका रुग्णालयांवर वाढता ताण

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांमध्ये सुमारे ४० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. यात केवळ मुंबई महानगर प्रदेशातूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथूनही रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत आहेत. यामुळे पालिकेवरील ताण मात्र वाढत आहे.

मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत असलेला रुग्णसंख्येचा आलेख या आठवडय़ात काही अंशी कमी झाला. परंतु रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झालेली नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के हे मुंबईबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या घटली तरी रुग्णालयांवरील ताण वाढतच असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढल्याने मागील दोन आठवडय़ांत मुंबईत खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. अजूनही शहरात अतिदक्षता खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. विशेषत: खासगी रुग्णालयांतील खाटांची मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याने या रुग्णालयांत अतिदक्षता खाटा मिळविण्यासाठी आणखीनच जिकिरीचे झाले आहे.

मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल इत्यादी भागांतील रुग्णांचे प्रमाण वाढले. या विभागांमध्ये अपुऱ्या खाटा आणि सोयीसुविधांची वानवा यांमुळे अनेक रुग्ण मुंबईकडे धाव घेत आहेत. पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरील असल्याचे आढळले आहेत. बाहेरील रुग्णालयांमध्ये प्राणवायूसह रेमडेसिविर औषधांचा साठा पुरेसा नसल्यानेही अनेक रुग्ण तेथून मुंबईत दाखल होत आहे. यात अगदी सांगली, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक इत्यादी जिल्ह्य़ांमधून रुग्ण मुंबईत येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढत आहे, असे वरिष्ठ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या रेमडेसिविर, टोसीलीझुमॅब इत्यादी औषधे, प्राणवायूचा बाजारात तुटवडा असल्याने हे सर्व उपलब्ध करण्यासाठी पालिकेलाही धावपळ करावी लागते. परंतु रुग्णांना कमतरता भासू नये म्हणून या बाबी उपलब्ध केल्या जातात. परंतु बाहेरील रुग्णांचा भार वाढल्यास यंत्रणेवरील ताण वाढतच जाईल, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मुंबईतील रहिवाशी अनेकदा बाहेरील जिल्ह्य़ांमधील नातेवाईकांना त्या ठिकाणी उपचार उपलब्ध नसल्याने मुंबईत बोलावून घेतात आणि थेट रुग्णालयात घेऊन येतात. इतक्या लांबून रुग्णवाहिका करून आलेल्या आणि गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना परत पाठविता येत नाही, दाखल करूनच घ्यावे लागते, असे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.

 

मुंबईतील रिक्त खाटांची स्थिती

                       पालिका रुग्णालये    खासगी रुग्णालये    

अतिदक्षता                       २२                    २९

प्राणवायू                           ५९७                  ४९९

कृत्रिम श्वसनयंत्रणा            १७                    २

सर्वसाधारण खाटा             ३४२०                 १२१४

(आकडे बुधवापर्यंतचे)

आमच्याकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथील सुमारे ४० टक्के रुग्ण असायचे. परंतु जेव्हा मुलुंडमध्ये दरदिवशी ५०० ते ६०० रुग्णांचे निदान व्हायला लागले तेव्हा आम्ही बंधने घालून ही संख्या हळूहळू कमी केली. परंतु अजूनही बाहेरचे रुग्ण येतात. रुग्णालयात आल्यावर अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे असल्यास रुग्णांना दाखल करून घ्यावेच लागते.

– डॉ. प्रदीप आंग्रे, अधिष्ठाता, मुलुंड करोना केंद्र