लग्न ठरवण्यापूर्वी निश्चित मत असलेल्या अविवाहित तरुणींपैकी सुमारे ४० टक्के तरुणींना त्यांचे आडनाव बदलायचे नाही. लग्नानंतर मूल केव्हा व्हावे हे ठरवण्याचा अधिकार हवा आणि लग्नानंतरही आईवडिलांची जबाबदारी घेण्याचे स्वातंत्र्य गरजेचे असल्याचे अविवाहित तरुणींचे मत आहे, असे ऑनलाइन विवाहनोंदणी करणाऱ्या एका संकेतस्थळाच्या पाहणीत आढळून आले. २५ ते ३४ वर्षे वयोगटातील साडेबारा हजार तरुणींनी दिलेल्या प्रतिसादावरून ही पाहणी करण्यात आली. भारतीय तरुणींची बदललेली मानसिकता, लग्नांसंबंधीची मते व स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा निश्चय या आकडेवारीतून दिसून येतो, असे शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित यांनी सांगितले.
संकेतस्थळाने केलेल्या पाहणीनुसार..
’ लग्नेच्छुक पण लग्नाबाबत निश्चित मते किंवा पूर्वअटी असलेल्या तरुणींची संख्या ७१ टक्के आढळली.
’ सहा टक्के मुलींच्या कोणत्याही अटी नव्हत्या तर २३ टक्के मुलींनी याबाबत कोणताही विचारच केला नव्हता.
’ लग्नासंबंधी विचार केलेल्या मुलींमध्ये स्वतचे अस्तित्व आणि ओळख जपण्याचा कल होता. त्यामुळेच विवाहानंतरही आडनाव बदलायला आवडणार नाही असे ४० टक्के मुलींनी स्पष्ट केले
’ लग्नानंतर आईवडिलांची जबाबदारी घेणार असल्याचे २५ टक्के मुलींनी सांगितले.
’ ’मूल नेमके केव्हा हवे हे ठरवण्याचा अधिकार आपलाही असेल आणि त्यात सासू-सासऱ्यांची लुडबुड नको असल्याचे ३२ टक्के तरुणींनी ठरवले आहे.