जयेश शिरसाट

वाहतूक पोलिसांकडे अचूक, पुरेपूर तपशील नसल्याने शहरातील ४० टक्के वाहन मालक आजही ई-चलन कारवाईच्या परिघाबाहेर आहेत. चलन पोहोचत नसल्याने लाखो वाहन चालक-मालक त्यांना आकारण्यात आलेल्या दंडाबाबत अनभिज्ञ आहेत. परिणामी, ई-चलन प्रणालीची अंमलबजावणी आणि दंड वसुलीत अडथळे निर्माण झाले आहेत.

आजमितीस शहरात सुमारे ३६ लाख वाहने आहेत. चार वर्षांमध्ये वाहतूक पोलिसांनी नियम मोडल्याबद्दल १.१३ कोटी चलन जारी केली. त्याचा एकूण दंड ३७८ कोटींच्या घरात आहे. मात्र, यातील ६८ लाख वाहन मालकांकडून अद्यापही दंड वसूल झालेला नाही. ही रक्कम २३६ कोटी इतकी आहे.

चार वर्षांपूर्वी शहरात प्रयोगिक तत्त्वावर ई-चलन कारवाई सुरू करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून जागच्या जागी रोख स्वरूपात दंड वसूल करण्याची, दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद करून दंड भरण्याची जबाबदारी चालक-मालकांवर सोपवण्यात आली. कालांतराने ई-चलन प्रणालीला ‘सीसीटीव्ही’ आणि वेग मोजणाऱ्या अद्ययावत कॅमेऱ्यांची जोड मिळाली. त्यामुळे एका झटक्यात, एकाच वेळी संपूर्ण शहरात नियम मोडणाऱ्या शेकडो वाहन चालक-मालकांविरोधात ई-चलन जारी होऊ लागली.

वाहन मालकांचे अपुरे तपशील हा चलन बजावणी आणि दंड वसुलीतील मुख्य अडथळा आहे. चलन प्रणाली सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहन मालकांचे तपशील मागविले. मात्र ते अपुरे, चुकीचे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरटीओतील कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांच्या हस्तलिखित नोंदी संगणकावर घेताना अनवधानाने केलेल्या चुकाही समोर आल्या. जसे मालकाचा संपर्क क्रमांक नोंदवताना एखादा आकडा गाळला गेला, भलताच आकडा लिहिला गेला. त्यामुळे चलन जारी झाले पण ते प्रत्यक्ष मालकापर्यंत पोहोचू शकलेले नाही. निवासी पत्त्याबाबतही तोच गोंधळ झाला. सर्व तपशील अचूकरीत्या नोंद झाले तरी मूळ मालकाने अन्य व्यक्तीला वाहन विकले किंवा स्वत:चा संपर्क क्रमांक, पत्ता बदलल्याने चलन बजावणीत अडचणी येऊ लागल्या. पोलिसांनी निवासी पत्त्यावर चलन बजावणीचे प्रयत्न केले तेव्हा असंख्य मालक आता तेथे राहात नाहीत, ही माहिती पुढे आली.

वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार विमा कंपन्यांकडून तपशील घेऊन ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. चलन बजावणीत निर्माण झालेला संभ्रम किंवा तक्रारी घेऊन वाहन मालक तक्रार निवारण केंद्रात येतात किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधतात. समोर येणाऱ्या त्या त्या प्रकरणानुसार नेमके तपशील नोंदवून घेतले जात आहेत. शिवाय अ‍ॅपद्वारेही नेमके तपशील मिळत आहेत. त्यामुळे अचूक आणि पुरेपूर तपशील मिळवण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तपशिलांची पोकळी वाहतूक पोलिसांना त्या त्या प्रकरणांनुसार भरून काढावी लागेल. विविध कारणांसाठी आरटीओ किंवा विमा कंपन्यांकडे येणाऱ्या वाहनांचे तपशील पोलिसांना मिळू शकतील. मात्र ही प्रक्रिया पूर्ण व्हायला बराच काळ लागेल, अशी माहिती वाहतूकतज्ज्ञ विवेक पै यांनी दिली.

दंड वसुलीसाठी प्रयत्न..

दंड वसुलीचा वेग वाढावा यासाठी वाहतूक पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. मध्यंतरी मोठय़ा दंडाची रक्कम न भरलेल्या सुमारे १० हजार मालकांना लघुसंदेश धाडून प्रकरणे न्यायालयात पाठवली जातील, अशी सूचना करून पाहिली. सध्या सर्व दंड एकत्र भरण्याऐवजी दोन चलनांचा दंड भरून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरा, अशी सूचना वाहतूक पोलीस करत आहेत. ही सुविधा रिक्षा, टॅक्सी चालक किंवा भाडय़ाने वाहने देणाऱ्या कंपन्यांची अडचण लक्षात घेऊन करण्यात आली आहे. तत्पूर्वी टपाल खात्यासोबत करार करून ई-चलन बजावणी करणे शक्य आहे का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी केली होती.