News Flash

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची ४० टक्के पदे रिक्त

निमवैद्यकीय पदेही मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय ग्रामीण आरोग्य अहवाल; प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा

मुंबई : राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचे केंद्रीय ग्रामीण आरोग्य अहवालातून निदर्शनास येते. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या ४० टक्के, तर प्राथमिक आरोग्य केंद्रावरील (पीएचसी) ७ टक्के पदे रिक्त आहेत. निमवैद्यकीय पदेही मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

ग्रामीण भागात बिगर आदिवासी भागात ३० हजार आणि आदिवासी भागात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक केंद्र कार्यरत असते. सर्वसाधारणपणे चार ते पाच पीएचसीसाठी एक ग्रामीण रुग्णालय असते. पीएचसीच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी या रुग्णालयात पाठविले जाते. यात स्त्रीरोग, प्रसूती, बालरोग आणि फिजिशियन असे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र राज्यात सध्या ८२३ जागांपैकी ४६५ डॉक्टर उपलब्ध आहेत. नियमानुसार, १ हजार ४५६ डॉक्टरांची आवश्यकता आहे. त्यामुळे खरेतर ९७१ डॉक्टरांचा तुटवडा असल्याचे अहवालात अधोरेखित केले आहे.

राज्यात २००५ ते २०१९ या काळात ग्रामीण रुग्णालय आणि पीएचसीवरील लोकसंख्या वाढली असली तरी त्या तुलनेत डॉक्टर, परिचारिका यांसह निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे अहवालात मांडले आहे. २००५ मध्ये पीएचसीवर ३ हजार १५८ डॉक्टर रुजू होते, मात्र २०१९ मध्ये यातही घट होऊन सध्या २ हजार ९५१ डॉक्टर उपलब्ध आहेत.

पीएचसी आणि सीएचसीवरील परिचारिकांच्या २५९ जागा अद्याप भरलेल्या नाहीत. यासह निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ (४२६), फार्मासिस्ट (१७३), रेडिओग्राफर (३३) यांच्याही जागा रिक्त आहेत.

पीएचसी आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे स्थिती

पदे                         परिचरिका       तंत्रज्ञ        फार्मासिस्ट     

आवश्यक जागा       ४,३७६           २,१९२         २,१९२

प्रत्यक्षात पदे           २,९५७            १,८६२         १,९९८

भरलेली पदे              २,६९८            १,४३६         १,८२५

रिक्त पदे                   २५९              ४२६             १७३

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागा

वर्ष                             २००५       २०१९

आवश्यक जागा          १५२८       १४५६

प्रत्यक्षात पदे               ९८७        ८२३

भरलेली पदे                 १०९९      ४८५

रिक्त पदे                     ८८८        ३३८

रुग्णांची गैरसोय : पीएचसीवर डॉक्टर, परिचारिका यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण येतो. यामुळे रुग्णांचीही मोठी गैरसोय होते. पीएचसीवरील तपासण्या दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू असतात. बाह्य़रुग्ण विभागात डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्ण तपासून त्या वेळेत तपासण्या पूर्ण होत नाही. त्यामुळे रुग्णांना दोन किंवा तीन वेळा हेलपाटे घालावे लागत असल्याचे अकोल्यातील एका पीएचसीतील डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:06 am

Web Title: 40 percent vacant posts of doctors in rural hospital zws 70
Next Stories
1 विद्यापीठाच्या गुणपत्रिकाही ऑनलाइन
2 नव्या नियुक्तीला विरोध; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
3 राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट, ९ फेब्रुवारीच्या मोर्चाबद्दल चर्चा?
Just Now!
X