‘स्पाइस जेट’ या विमानसेवा कंपनीचा आर्थिक डोलारा डळमळीत होऊ लागल्याने गेल्या काही काळात तब्बल ४० वैमानिकांनी नोकरीला रामराम ठोकल्याचे समजते. या विमानसेवा कंपनीच्या सलग पाचव्या तिमाही ताळेबंदात तोटा झाला असून सुमारे ३१० कोटी रुपयांचा तोटा नोंदला गेला आहे. कंपनीच्या महसुलातही घट होत आहे. कंपनी सतत तोटय़ात असल्याने गेल्या सहा महिन्यांत ४० वैमानिकांनी रामराम ठोकल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. वैमानिकांच्या राजीनाम्याचा फटका विमानसेवेला बसला आहे. उड्डाणास उशीर, विमानाच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत ‘स्पाइस जेट’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उत्तर मिळाले नाही, असेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.