02 March 2021

News Flash

मुंबईतील ४० खासगी रुग्णालये धोकादायक

शहरातील रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासण्या करण्याची मागणी भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर केली जात होती.

(संग्रहित छायाचित्र)

अग्निशमन विभागाच्या तपासणीतील निष्कर्ष

मुंबई: शहरातील ४० खासगी रुग्णालये धोकादायक असल्याचे अग्निशमनच्या तपासणीत निदर्शनास आले असून ३४२ रुग्णालयांमध्ये विविध स्वरूपाचे धोके आढळले आहेत. पालिकेच्या अग्निशमन विभागाने मुंबईतील ११ हजार रुग्णालयांची तपासणी केली होती.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या आगीच्या प्रकरणानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दृष्टीने पालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांची अग्निशमन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यात ११ हजार ४९ खासगी रुग्णालयांची तपासणी केली. रुग्णालयांच्या रचनेसह सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोके असल्याचे ४० खासगी रुग्णालयांमध्ये आढळले, तर ३४२ रुग्णालयांमध्ये आग लागल्यास इमारतीबाहेर पडण्याच्या रस्त्यांमध्ये अडगळीच्या सामानामुळे जाण्यास रस्ता उपलब्ध नसणे, आग विझविण्याची साधने उपलब्ध नसणे किंवा असल्यास त्यांची मुदत संपलेली असणे इत्यादी धोके दिसून आले. शहरातील ६३९ रुग्णालयांमध्ये काही किरकोळ दुरुस्ती करण्याचे आवश्यक असल्याचे या तपासणीतून समोर आले. सुमारे ११ हजार रुग्णालयांपैकी १२८ रुग्णालये बंद होती.

शहरातील रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासण्या करण्याची मागणी भंडाऱ्याच्या दुर्घटनेनंतर केली जात होती. अहमदाबादमध्ये करोना रुग्णालयात आग लागली होती, त्या घटनेनंतर सार्वजनिक रुग्णालयांच्या अग्निशमन विभागाच्या तपासण्या केल्या होत्या. यात किरकोळ दुरुस्त्या विभागाने सुचविल्या होत्या. याचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु खासगी रुग्णालयाच्या तपासण्या केल्या नसल्याने तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

गंभीर धोके आढळलेल्या रुग्णालयांसह किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या अशा जवळपास एक हजार रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली आहे.  धोकादायक रुग्णालयांना रचना बदलण्यासह मोठा खर्च करावा लागणार आहे. तशा सूचना अग्निशमन विभागाने दिल्या आहेत.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 1:55 am

Web Title: 40 private hospitals in mumbai are dangerous akp 94
Next Stories
1 राज्यात २ लाख ८२ हजार असंसर्गजन्य रुग्णांची नोंदणी
2 अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोनावाढीचा वेग कमी
3 शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन नव्हतेच!
Just Now!
X