दोन वर्षांचा असताना रेल्वेगाडीत सोडून दिल्याचा आरोप

मुंबई : दुसऱ्या विवाहासाठी दोन वर्षांचा असताना सोडून देणाऱ्या आणि नंतर मुलगा म्हणून स्वीकार करण्यासही नकार देणाऱ्या जन्मदात्या आईविरोधात एका ४० वर्षांच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एवढेच नव्हे, तर आजीला कायदेशीर पालकत्व मिळेपर्यंत आपल्याला भिकाऱ्यासारखे जीवन जगण्यास भाग पाडल्यामुळे आई आणि तिच्या दुसऱ्या पतीला १.५ कोटीच्या नुकसानभरपाईचे आदेश देण्याची मागणीही त्याने केली आहे. न्यायालयाने सोमवारी याप्रकरणी आई आणि सावत्र पित्याला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

श्रीकांत सबनीस असे या याचिकाकर्त्यांचे नाव असून तो मेकअप आर्टिस्ट आहे. मुंबईसारख्या अनोळखी शहरात हेतूत: सोडून देऊन क्लेषदायक आणि मानसिक आघातांनी भरलेले जीवन जगण्यास भाग पाडल्याची जन्मदाती आई आणि तिचा दुसऱ्या पतीने नुकसानभरपाई द्यायला हवी, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.

याचिकेनुसार, आपले आई-वडील दोघे पुण्यात वास्तव्याला होते. फेब्रुवारी १९७९ मध्ये आपला जन्मही तिथेच झाला. आपली आई खूप महत्त्वाकांक्षी होती आणि चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तिला मुंबईत यायचे होते. सप्टेंबर १९८१ मध्ये आपल्याला घेऊन तिने मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर मात्र ती आपल्याला गाडीत सोडून निघून गेली. एका रेल्वे अधिकऱ्याला आपण सापडलो आणि कायद्यानुसार नंतर आपल्याला बालगृहात पाठवण्यात आले.

आईच्या आईला म्हणजेच आजीला आपल्याबाबत कळले. त्यानंतर १९८६ मध्ये तिला कायदेशीररीत्या आपले पालकत्व मिळवण्यात यश मिळाले. सुरुवातीला आजीसोबत राहिलो. मात्र नंतर मावशीने आपला सांभाळ केला. २०१७ मध्ये आपल्याला जन्मदात्या आईबाबत कळले. तिच्याबाबत कळल्यावर आपण तिचा संपर्क क्रमांक मिळवला आणि तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तिने आपण तिचा मुलगा असल्याचे आणि काही अपरिहार्य परिस्थितीमुळे आपल्याला सोडून दिल्याचे मान्य केले. त्यानंतर आपण तिची आणि तिच्या दुसऱ्या पतीची भेट घेतली. मात्र आपण कोण आहोत हे सत्य त्यांच्या मुलांसमोर उघड न करण्यास सांगितले, असा दावा श्रीकांत यांनी याचिकेत केला आहे.

आईने मुलगा म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याने आणि सोडून दिल्याने आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घ्यावा लागला, खोटय़ा पालकांपासून ते निरीक्षण गृहापर्यंत भटकत राहावे लागले. आईच्या या कृतीमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले. आयुष्यभर भीतिदायक आयुष्य व्यतीत करावे लागले. त्यामुळेच आईला आपण तिचा मुलगा आहोत आणि दोन वर्षांंचा असताना तिने आपल्याला सोडून दिले हे स्वीकारण्यास सांगण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. आई आणि तिच्या दुसऱ्या पतीच्या कृतीमुळे आयुष्यभर आपण मानसिकदृष्टय़ा अशांत राहिलो. त्यामुळेच त्या दोघांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत,

अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.