सोलापूर येथे एका निवासी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिसावर कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर २ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ३० डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर येथे डॉ. प्रशांत पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली होती. याविरोधात निवासी डॉक्टरांच्या (मार्ड)मध्यवर्ती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपूर्ण राज्यात सुमारे ४ हजार निवासी डॉक्टर असून मुंबईतील सुमारे दीड हजार डॉक्टरही या संपात सहभागी होणार असल्याने सार्वजनिक आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
निवासी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई झाली तर संपाचा फेरविचार करण्यात येणार आहे. या बेमुदत संपाबाबत ‘डायरेक्टर ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन’ यांनाही कळविण्यात आले आहे.
दरम्यान, ‘मार्ड’च्या या बेमुदत संपात मुंबईतील शीव, केईएम, नायर आणि जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही सहभागी होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या चारही रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया यावर परिणाम होणार आहे. मुंबईत या चार रुग्णालयात सुमारे पंधराशे निवासी डॉक्टर आहेत.