शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या निष्फळ चर्चेनंतर राज्यातील शिकाऊ डॉक्टरांच्या बेमुदत संपाला गुरूवारी सकाळपासून सुरूवात झाली. त्यामुळे  रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत. मार्डच्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स) मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतरही मार्डने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला होता. बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमवेत तीन तास मार्डच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्यही केल्या होत्या. पण अचानक लेखी आदेश न दिल्याचे कारण पुढे करत अचानक संपावरच जाण्याचा निर्णय मार्डने कायम ठेवला.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून शिकाऊ डॉक्टरच्या झालेल्या मानसिक छळाचे निमित्त करत मार्डने आंदोलनाची हाक दिली होती. विविध मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या होत्या. त्यात वेतनवाढ, रजा मिळावी, कामाचे तास कमी करावे, सुरक्षेसाठी बाऊन्सर्स पुरवणे आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्या मान्य न झाल्यास आज, गुरुवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मार्ड च्या या मागणीवर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी मार्डच्या प्रतिनिधींबरोबर बैठक आयोजित केली होती. तब्बल तीन तास ही बैठक चालली. सुरक्षेसाठी बाऊन्सर्स पुरवता येणार नसले तरी चांगली सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, असे ते म्हणाले.
नागपूर महाविद्यालयातील त्या डॉक्टरवर यापूर्वीच कारवाई झाली असल्याने पुन्हा कारवाई करता येणार नसल्याचे सांगितले.  परंतु तावडे यांनी मार्डच्या इतर सर्व मागण्यांना तत्वत: मान्यता दिली. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्ड आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधी आदींची बैठक करून त्याला मान्यता देण्याचे जाहीर केले. परंतु या बैठकीनंतर आश्वासनांचा अध्यादेश काढला नाही, लेखी आदेश मिळाला नाही, असे कारण देत मार्ड च्या डॉक्टरांनी घोषणा देत संप सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.
रुग्णांचे हाल होणार
राज्यातल्या १४ वैद्यकीय महाविद्यालयातील ४ हजार शिकाऊ डॉक्टर्स गुरवार सकाळी ८ वाजल्या पासून संपावर जाणार आहेत.त्यामुले रुग्णांचे हाल होणार आहेत. मुंबईतल्या जेजे, कामा, जी.टी आणि सेंट जॉर्जस रुग्णालयातील रुग्णांना त्याचा त्रास होणार आहे. संपकर्त्यां डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे. सरकार वेळोवेळी मार्ड च्या मागण्या मान्य करत असूनही संपाचे हत्यार उपसत मार्ड रुग्णांना वेठीस धरत असल्याबद्दल वरिष्ठ डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.